ओबीसी आरक्षण लढ्यासाठी बारामतीतून एल्गार

    बारामती : ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील ओबीसी नेते व संघटना आक्रमक झाल्या असून, राज्यात ओबीसी एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनाची बैठक बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे संपन्न झाली.

    ओबीसीचे अतिरिक्त आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरविल्यानंतर देशात आणि राज्यात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. हक्काचं राजकीय आरक्षण गेल्यामुळे ओबीसीमध्ये येणाऱ्या सर्व जाती-धर्मातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. याची तयारी करण्यासाठी ओबीसीचे अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक यांची बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील गंगोत्री लॉन येथे बैठक पार पडली.

    या बैठकीत ओबीसीच्या अनेक मागण्या आणि त्यावर पाठपुरावा कसा करावा? एल्गार महामोर्चाचे नियोजन कसे करावे याबाबत नियोजन करण्यात आले. यावेळी हे ओबीसी एल्गार महामोर्चा हा राजकीय पक्ष विरहीत असावा. यावर एकमत करून तशा पद्धतीने पुढची दिशा ठरवण्यात आली आहे.

    यावेळी विश्वासराव देवकाते, बापुराव सोलनकर, डॉ अर्चना पाटील, पांडुरंग मेरगळ, सुरेश कांबळे, ऍड. गुलाबराव गावडे, बापुराव सोलनकर, अनिल लडकत, गणपतराव देवकाते, संपतराव टकले, ज्योती झूरगे, किशोर मासाळ, मच्छिंद्र टिंगरे, दादा थोरात, ज्ञानेश्वर कौले, माणिक काळे, संजय कुंभार ओबीसी समाजातील अनेक मान्यवर, नेते, सामाजिक कार्यकर्ते, आणि अभ्यासक उपस्थित होते.