काेरोना काळातही मायलेकी ‘असे’ करताहेत जनजागृती

    यवत : कोविड काळामध्ये शाळा बंद असतानाही दौंड तालुक्यातील वडगाव बांडे शाळेतील शिक्षिका सुनीता विजय काटम यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य, शाळाबाह्य मुलांचे शिक्षण, मुलींचे आरोग्य, किशोरवयीन मुला मुलींचे आरोग्य व्यवस्थापन, मासिक पाळी व्यवस्थापन या विषयांवर जनजागृती केली.

    राज्यातील ८००० विद्यार्थिनींना प्रशिक्षण

    काटम यांनी केवळ दौंड तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील जळगाव, अमरावती, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, पलूस या ठिकाणी असलेल्या महिला व किशोरवयीन मुली यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचे काम केले. दौंड तालुक्यातील १२००० व राज्यभरातील ८००० विद्यार्थिनींना ऑनलाइन पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यामध्ये त्यांना त्यांची मुलगी साक्षी काटम यांनी केवळ तांत्रिक सहकार्य केले नाही तर प्रशिक्षक म्हणून स्वतः कामही केले. साक्षी काटम या वेदिक सायकॉलॉजी एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीत द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहेत.

    आईबरोबर सामाजिक कार्य

    साक्षी आईबरोबर सामाजिक कार्याची धुरा सांभाळत शाळा बाह्य मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. त्याच बरोबर मुलींच्या आरोग्याबाबत असणाऱ्या सर्व प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेत आहेत. प्रबोधन व जागर कार्यक्रमांतर्गत  इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन प्रशिक्षणे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये चांगले वाईट स्पर्श, कोविड जनजागृती बाल हक्क कायदे, मुलांचे अधिकार, किशोरवयीन मुलांचे आरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन अशा अनेक विषयांचा समावेश आहे. ही प्रशिक्षणे ऑनलाइन, ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेण्यात आली. पुणे येथील श. ल. चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने या कार्याचा गौरव करण्यात आला.