आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी शोधायची असेल तरी उद्धव ठाकरे केंद्राला पत्र लिहतील; चंद्रकांत पाटलांची टीका

उद्या आदित्य ठाकरे यांना लग्नासाठी मुलगी बघायची वेळ आली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारला पत्र लिहतील, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्य सरकार काही झाले की केंद्र सरकारकडे बोट दाखवते, असेही त्यांनी यावेळी म्हटले. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

  पुणे : उद्या आदित्य ठाकरे यांना लग्नासाठी मुलगी बघायची वेळ आली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारला पत्र लिहतील, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्य सरकार काही झाले की केंद्र सरकारकडे बोट दाखवते, असेही त्यांनी यावेळी म्हटले. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

  दरम्यान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या संदर्भात भाष्य केले. राज्य सरकाकडून संभाजीराजे यांची हेरगिरी होत असल्याची बाब समोर आली आहे. मी याचा निषेध करतो. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील सरकार हे कोडगं आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा दिला तर कोणावरही परिणाम होणार आहे का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला. तसेच ओबीसी आरक्षणाचा केंद्र सरकारशी कोणताही संबंध नाही. राज्य सरकारने दीड वर्षापासून मागासवर्गीय आयोगच नेमला नाही. तो आधी नेमला जावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

  ‘शरद पवार आणि फडणवीसांची भेट राजकीय नव्हती’ – पाटील

  शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती. शरद पवार आजारी असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेले होते. फडणवीस यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यामध्ये काहीही राजकीय नव्हते. आजदेखील देवेंद्र फडणवीस हे जळगावात नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

  .तर भाजप पुढची 100 वर्षे सत्तेत येणार नाही: संजय राऊत

  संजय राऊत यांना सिल्व्हर ओक येथे झालेल्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी विचारण्यात आले. तेव्हा संजय राऊत यांनी या भेटीमुळे महाविकासआघाडी सरकार अस्थिर होण्याचा दावा फेटाळून लावला. महाराष्ट्रातील राजकीय नेते एकमेकांना अशाप्रकारे भेटत असतात, आपल्याकडे तशी परंपरा आहे. शरद पवार यांची तब्येत सध्या थोडीशी खराब आहे. त्यामुळे फडणवीसांनी सदिच्छा भेट दिली असेल, असे राऊत यांनी म्हटले.

  या भेटीत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा कानमंत्र सांगितला असेल का, असा प्रश्नही राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी म्हटले की, होय, शरद पवार यांनी फडणवीसांना सत्तेचा कानमंत्र दिला असेल. विरोधी पक्ष अशाचप्रकारे सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत राहिला तर पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल. शरद पवार यांनीही विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून फडणवीसांना मार्गदर्शनच मिळाले असावे, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.