अखेर इडब्ल्यूएस प्रकल्प रद्द; प्राधिकरणाच्या पेठ ६ मधील आरक्षण हस्तांतराची मागणी

मल्टीपर्पज हॉलसह गार्डन, पार्किंगची सुविधा निर्माण करणार ; स्थानिक नागरिकांसह आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पेठ क्रमांक ६ मधील ‘इडब्ल्यूएस’ प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. या ठिकाणी मल्टिपर्पज हॉल, उद्यान, पार्किंगची सुविधा निर्माण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

प्राधिकरणाच्या हद्दीतील स्पाईन रोडलगत असलेल्या पेठ क्रमांक ६ मधील आरक्षित जागेत ‘इडब्लूएस’ अर्थात आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी घरे असे आरक्षण होते. त्याच्या विकासाचे आदेशही निर्गमीत करण्यात आले होते. मात्र, स्थानिक नागरिक आणि भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. तसेच, संबंधित आरक्षण सार्वजनिक सुविधांसाठी महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी केली होती.

दरम्यान, याबाबत विभागीय आयुक्त व प्राधिकरणाचे अध्यक्ष सौरभ राव यांची आमदार लांडगे यांनी भेट घेतली. यावेळी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगरविकास प्राधिकरण हद्दीतील पेठ क्रमांक ६ येथे ‘इडब्ल्यूएस’ (आर्थिक दुर्बल घटकांना घर) असे आरक्षण आहे. त्यानुसार सदर ठिकाणी प्राधिकरण प्रशासनामार्फत निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली होती. परंतु, या प्रकल्पाला स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. त्यामुळे प्रशासनाने सदर प्रकल्पाचे काम रद्द केले आहे.

मल्टीपर्पज हॉल, पार्किंगसह १६ रोहाउसची निर्मिती

‘इडब्ल्यूएस’ आरक्षण रद्द करुन मल्टिपर्पज हॉल् (बहुउद्देशीय सभागृह), उद्यान, पार्किंग आदीबाबत आरक्षित करुन तातडीने विकासकामे हाती घेण्यात यावीत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे. ‘इडब्ल्यूएस’ प्रकल्पाचे काम रद्द करुन पेठ क्रमांक ६ मध्ये मल्टीपर्पज हॉल, पार्किंग सुविधा अशा सार्वजनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच, उर्वरित जागेत १६ रोहाउस बनवण्यात येत आहे. रोहाउसचे कामही सुरू झाले आहे. विभागीय आयुक्त, प्राधिकरण प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे स्थानिक नागरिक आणि आमदार लांडगे यांच्या मागणीला यश मिळाले आहे.