कोथरूडधील महात्मा सोसायटीत रानगवा आल्यानं खळबळ, वन विभागाचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण

कोथरूड परिसरातल्या महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक एकमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना गवा दिसला. सुरुवातीला नागरिकांना ही एखादी गाय असावी अथवा म्हैस असावी असे वाटले. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. पण काही काळाने तो गवा असल्याचे लक्षात येताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली.

कोथरूड : पुण्याच्या (Pune) कोथरूड (Kothrud) परिसरात रानगवा आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच गव्याने महात्मा सोसायटी येथील भरवस्तीत शिरकाव केल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गव्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू होती. परंतु गव्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अखेर यश मिळालं आहे.

गवा मानवी वस्तीत आला कसा ?

कोथरूड परिसरातल्या महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक एकमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना गवा दिसला. सुरुवातीला नागरिकांना ही एखादी गाय असावी अथवा म्हैस असावी असे वाटले. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. पण काही काळाने तो गवा असल्याचे लक्षात येताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली.

त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी गव्याला घाबरून पळ काढला. गव्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. तब्बल दहा फूट उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून हा गवा मोकळ्या जागेमध्ये शिरल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

दरम्यान, गवा जंगलात राहणारा प्राणी असल्याने तो मानवी वस्तीत कसा आला ? याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. परंतु वन विभागाने आणि प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे.