शिक्षकांना कोरोना सेवेतून वगळा

तालुका प्राथमिक शिक्षक संघाची मागणी
भोर : तालुक्‍यातील शिक्षक व केंद्र प्रमुख यांना सरकारने एप्रिल २०२० पासून कोविड–१९ बाबत ड्युटी लावली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे करोना कामातून शिक्षकांना वगळावे, अशी मागणी भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रांत अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना निवेदन देऊन केली आहे. तालुक्‍यात नाकांबदी, सर्वेक्षण, कोविड सेंटर, ऑनलाईन माहिती, “माझे कुटुंब-माझी जबाबदारी’च्या सर्वेक्षण काम, रेशनिंग वाटप पर्यवेक्षकीय कामामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संघटनेचे अध्यक्ष सुदाम ओंबळे, आप्पा सांवत, पंडीत गोळे, जगन्नाथ सोनवणे, विजय थोपटे, संदीप दानवले, दत्तात्रय पांगारे, हनुमंत साप्ते, प्रवीण नांदे यांनी प्रशासनाच्या विभाग प्रमुखांना निवेदन देऊन मागणी केली आहे.