जम्बो रूग्णालयातील २०० बेडसाठी दीड महिन्यात दोन कोटीचा खर्च

कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रूग्णालयात ८०० बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विभागिय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या सुचनेनुसार आपत्कालीन बाब म्हणून रूग्णालयाचे कामकाज पाहणाऱ्या एजन्सीचे बील तपासणे तसेच इतर व्यवस्थापन करण्यासाठी एएए हेल्थकअर या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती.

    पिंपरी: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. यापार्श्वभूमीवर नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रूग्णालयात केवळ २०० बेड ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये १४० ऑक्सिजनयुक्त आणि ६० आयसीयू बेड उपलब्ध आहेत. गेल्या दीड महिन्यात या रूग्णालयावर २ कोटी ११ लाख रूपये खर्च झाला आहे.

    पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीमध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रूग्णालय टप्प्याटप्प्याने ८०० बेडसाठी सुरू करण्यात आले. कोरोना प्रादूर्भाव कमी होऊ लागल्यानंतर २५ मे २०२१ पासून बेडसंख्या कमी करण्यात आली. मेडब्रोज हेल्थकेअर डायग्नोस्टीक सेंटर यांना देण्यात आलेल्या ८०० बेड आदेशापैकी ४०० बेड बंद करण्यात आले. ३१ मे रोजी आणखी २०० बेड बंद करण्यात आले. आयसीयू आणि ऑक्सिजन बेडची आवश्यकता लक्षात घेऊन १ जून २०२१ ते ३० जून २०२१ पर्यंत १४० ऑक्सिजन युक्त बेड आणि ६० आयसीयू बेड सुरू ठेवण्यासाठी त्यांना १ कोटी ३७ लाख ९३ हजार रूपये कामाचे आदेश देण्यात आले होते. त्यांनतर त्यांना १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार, १ जुलै ते १५ ऑगस्ट २०२१ या दीड महिना कालावधीसाठी २०० बेडकरिता २ कोटी ११ लाख ४९ हजार रूपये खर्च करण्यात आला आहे.

    एजन्सीचे बील तपासणाऱ्या सल्लागाराला २५ लाख देणार

    कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रूग्णालयात ८०० बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विभागिय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या सुचनेनुसार आपत्कालीन बाब म्हणून रूग्णालयाचे कामकाज पाहणाऱ्या एजन्सीचे बील तपासणे तसेच इतर व्यवस्थापन करण्यासाठी एएए हेल्थकअर या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. २९ मार्च ते २८ मे या दोन महिने कालावधीसाठी त्यांनी कामकाज पाहिले. त्यानुसार, त्यांना २५ लाख रूपये देण्यात येणार आहेत.