तोतया सामाजिक कार्यकर्ता राजेश लाड खंडणीप्रकरणी अटकेत; दौंड पोलिसांची कारवाई

  पाटस : ‘मी सामाजिक कार्यकर्ता आहे. तुम्हाला मुरूम, माती उपसा करून वाहतूक करायची मग मला पैसे द्या नाही तर मी तुम्हाला मारून टाकीन’, अशी धमकी देत कित्येक जणांकडून पैस उकळणारा दौंड तालुक्यातील पाटस येथील स्वयंघोषित आणि तोतया सामाजिक कार्यकर्ता राजेश पांडुरंग लाड यास दौंड पोलिसांनी खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केले. ही माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

  राजेश पांडुरंग लाड (रा.पाटस. ता.दौंड.जि.पुणे ) असे या खंडणीखोराचे नाव आहे. याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अष्टविनायक महामार्ग पारगाव ते दौंड रोड रोड मार्गावरील मुरूम टाकण्याचे काम चालू आहे. या कामासाठी अंकुश रामचंद्र वनवे यांचे टिपर हे रोटी येथून दौंड तहसीलदार यांनी रितसर परवानगी दिल्याने वाहतूक करून रोडच्या कामावर खाली करीत आहे. मंगळवारी (दि.20) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास टिपरचालक संतोष भुजबळ हे वायरलेसफाटा बेटवाडी (ता.दौंड जि.पुणे) येथील हेमंत राजाराम जाधव यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत लावण्यासाठी गेले.

  त्यावेळी राजेश लाड याने टिपर चालकाला दमदाटी करून मुरमाने भरलेला टिपर मोकळ्या जागेत खाली करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याच्या मोबाईलमधून फोटो काढले, टिपर चालकाने मोबाईवर सांगितल्याने अकुंश वनवे त्याठिकाणी गेले असता ‘तू मला एक लाख रूपये दिले तर मी तुझे वाहनाबाबत पुढे तक्रार करणार नाही, नाहीतर तुझा टिपर मुरमावर कसा चालतो ते पाहतो, असे म्हणून मला पैसे मागतिले.

  त्यानंतर वणवे यांनी व्यवसायातील मित्र राजेंद्र रामदास घाडगे यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यावेळी घाडगे यांनी सांगितले की, 20 दिवसांपूर्वी माझ्याकडून मी सामाजिक कार्यकर्ता आहे, असे सांगत अशीच धमकी देऊन वीस हजार रूपये घेतले. तुम्ही मुरूम काढणारे लोकांना मातीत गाडून टाकीन, अशी धमकी दिली होती.

  याबाबत अकुंश वणवे यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने राजेश पांडुरंग लाड या तोतया विरोधात जबर दुखापत व जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खरात हे करीत आहेत. दरम्यान, पाटस आणि दौंड परिसरात राजेश लाड ही व्यक्ती मी सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगत धमकी देऊन अनेकांकडून खंडणी स्वरूपात पैसे उकळत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. या व्यक्तीने अशा धमक्या देऊन अनेकांकडून पैसे उकळले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

  काही महिन्यांपूर्वी राजेश लाड या खंडणीखोरावर यवत पोलीस स्टेशनला खंडणी मागितल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ऍट्रोसिटीचा गुन्हाही दाखल आहे.