प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नाना गायकवाड आणि मुलावर दरोड्याचा गुन्हा

पिंपळे - निलख येथे सुरू असलेल्या बांधकाम साईटवर बांधकाम करण्यासाठी गेलेल्या कामगारांना दमदाटी करुन, सुरक्षा रक्षकास मारहाण करुन आरोपींनी काम बंद पाडले. तसेच साहित्य जबरदस्तीने नेवून, दहशत निर्माण केली.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक नानासाहेब गायकवाड, त्यांचे चिरंजीव, प्रदेश युवक कॉग्रेसचे सरचिटणीस केदार उर्फ गणेश गायकवाड यांच्यासह आणखी तिघांवर सांगवी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पिंपळे – निलख येथे सुरू असलेल्या बांधकाम साईटवर बांधकाम करण्यासाठी गेलेल्या कामगारांना दमदाटी करुन, सुरक्षा रक्षकास मारहाण करुन आरोपींनी काम बंद पाडले. तसेच साहित्य जबरदस्तीने नेवून, दहशत निर्माण केली. धक्कादायक म्हणजे आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देऊन पिस्तूलातून १० वेळा गोळीबार करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

    सांगवी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, या घटना १७ जानेवारी १९ ते २८ फेब्रुवारी २१ दरम्यान पिंपळे – निळख येथे घडल्या आहेत. याबाबत २४ जून २१ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. अजिंक्य विठ्ठल काळभोर (४५, रा. तुळजाई वस्ती, काळभोरनगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार नानासाहेब गायकवाड (रा. औंध), केदार उर्फ गणेश गायकवाड (रा.औंध), गणेश साठे, राजा आणि त्यांचे २ ते ३ साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गणेश गायकवाड हा प्रदेश युवक कॉग्रसेच्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहे. दरम्यान, तक्रारदार गुन्हा दाखल करण्यास घाबरत असल्याने गुन्हा उशिराने दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    फिर्यादी अजिंक्य काळभोर यांनी त्यांच्या पिंपळे – निलख येथील जागेवर बांधकाम करण्यासाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत. या जागेवर ले – आउट करण्यासाठी कामगार आणि ठेकेदार यांच्यासह ते त्या जागेवर गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन धमकी दिली. चालू असणारे काम बंद पाडले. त्या जागेवर करण्यात आलेली संरक्षण भिंत, कंपाउंड, लोखंडी पोल, पाण्याची टाकी आणि इतर साहित्य असे ४८ हजार रुपयांचे साहित्य जबरदस्तीने काढून नेले. सुरक्षा रक्षकास शिवीगाळ, मारहाण करुन दहशत निर्माण केली. पुन्हा या ठिकाणी आल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच १० वेळा फायरिंग करेल, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलिस ठाण्याचे फौजदार विनोद शेंडकर तपास करत आहेत.