फॅन्सी हेअरकटचे वांदे! लॉकडाऊनमुळे पुन्हा घरीच केस कापण्याची वेळ

लॉकडाऊनचा कालावधी संपण्याची वाट न पाहता मुलांचे केस कापण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेत हातात ट्रीमर घेतले आहे. त्यासाठी यू ट्युब तसेच सोशल मीडियावर केशकर्तनाचे अनेक व्हिडीओ सर्च केले जात आहेत. तर काहींच्या वाढलेल्या केसांमुळे त्यांचे लूक बदलल्याचे दिसून येते.

    पिंपरी: आपली केशरचना इतरांपेक्षा वेगळी दिसावी यासाठी तासंतास सलूनमध्ये वेळ घालवणारे सध्याच्या संचारबंदीच्या काळात घरीच कटिंग करण्यास प्राधान्य देत आहेत. राज्य शासनाने लॉकडाउन घोषित केल्यामुळे सलून व्यावसायिकांनी दुकाने बंद केली असून नागरिकांवर पुन्हा घरीच केस कापण्याची वेळ आली आहे.

    ना ऑफिस, ना कॉलेज, ना कुठले समारंभ अशी सध्याची परिस्थिती आहे. हेअर स्टाइल करून दाखविणार तरी कोणाला, असा प्रश्न अनेकांपुढे आहे. विशेष करून तरुणांमध्ये आपल्या आवडत्या सिने कलाकार आणि खेळाडूंप्रमाणे केशरचना करणाची क्रेझ असते. मात्र, सततच्या लॉकडाउनमुळे नागरिकांना आता घरीच घरीच केस कापायची सवय लागली आहे. यासाठी लागणारे विविध साहित्य आणि ट्रीमर ऑनलाइन उपलब्ध असल्याने अनेकांनी त्याची खरेदी केली आहे.

    लॉकडाऊनचा कालावधी संपण्याची वाट न पाहता मुलांचे केस कापण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेत हातात ट्रीमर घेतले आहे. त्यासाठी यू ट्युब तसेच सोशल मीडियावर केशकर्तनाचे अनेक व्हिडीओ सर्च केले जात आहेत. तर काहींच्या वाढलेल्या केसांमुळे त्यांचे लूक बदलल्याचे दिसून येते. अनेकजण आपला नवीन कट फेसबुक, व्हॉट्सअपवर डीपी म्हणून ठेवत आहेत. सलून व्यावसायिकांना ग्राहक मिळत नसल्याने दुकानाचे भाडे, इएमआय, कामगारांचे पगार देणे अवघड जात आहे.