शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्याचा भरसभेत आत्महत्येचा प्रयत्न

    इंदापूर : शेतीच्या पंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याने पाण्याअभावी पिक जळत असल्याने उद्विग्न झालेल्या गोखळी येथील शेतकऱ्याने शनिवारी (दि.२१) झगडेवाडी (ता.इंदापूर) येथील जाहीर कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. तथापि, महावितरणने एक दिवस आधीच त्याच्या शेतीपंपांचे वीज कनेक्शन जोडले असताना त्याची खातरजमा करण्याआधीच ‘त्या’ शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

    सविस्तर हकीकत अशी की, शनिवारी खासदार सुळे व राज्यमंत्री भरणे यांच्या उपस्थितीत झगडेवाडी येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सुरु असताना शिवाजी कृष्णा चितळकर हा शेतकरी थेट व्यासपीठावर आला. आपल्या शेतीपंपांची वीज बिलाची बाकी नसताना आपले वीज कनेक्शन सोडण्यात आले आहे.

    पाण्याअभावी पीक जळून जात आहे. महावितरण कंपनी आपल्याला न्याय देत नाही, असे सांगत त्याने आपल्या खिशात ठेवलेला दोरखंड काढला. त्याच्या हालचाली व मनस्थिती पाहून अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याच्या हातातील दोरखंड काढून घेत त्याला माघारी पाठवले. या प्रकाराने खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने चितळकर याच्या शेतीच्या वीजेचे कनेक्शन एक दिवस आधीच जोडल्याची माहिती पुढे आली आहे.

    महावितरणचे इंदापूरचे सहाय्यक अभियंता रघुनाथ गोफणे यांनी दै.’नवराष्ट्र ‘शी बोलताना सांगितले की, शिवाजी चितळकर यांना उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून १६ केव्हीए क्षमतेचे स्वतंत्र रोहित्र दिले आहे. त्यावर त्यांना ३ अश्वशक्ती क्षमतेचे कनेक्शन दीड वर्षांपूर्वी दिले आहे. त्यांचा ग्राहक क्र. १८७१ ८०००२६२९ असा आहे. बारामती परिमंडलात शेतीसह सर्वच वर्गवारीतील थकबाकीची वसूली मोहीम जोरात सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून १८ ऑगस्ट रोजी २ हजार ७४० रुपये थकबाकीपोटी शिवाजी चितळकर यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी चितळकर यांनी बिल भरल्याने २० ऑगस्टला त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. शुक्रवारी सकाळी ते इंदापूर ग्रामीण शाखेत आले होते. तेव्हा त्यांना याची कल्पना दिली होती, असे गोफणे यांनी स्पष्ट केले.

    चितळकर यांनी रानात जावून खातरजमा केली नाही. सरळ झगडेवाडी येथील कार्यक्रमात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती देवून महावितरण विभागाने राज्यमंत्री भरणे यांच्याकडे संपूर्ण प्रकाराचे स्पष्टीकरण दिले आहे, असे गोफणे यांनी सांगितले.