प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

बारामती : भरणेवाडी (ता इंदापूर) येथील एका शेतक-याने बारामती येथील बांधकाम व्यावसायिक नितिन काळे यांच्या सणसर (ता. इंदापूर) येथील निवासस्थाना जवळील आऊट हाऊस मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

अप्पाराव भरणे(वय ४० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. या घटनेमुळे  भरणेवाडी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

भरणेवाडी येथील अप्पाराव भरणे  यांनी गुरुवारी सायंकाळी नितीन काळे यांच्या बंगल्याच्या बाजूच्या आऊटहाऊसमध्ये जाऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी  दिली. दरम्यान आत्महत्येची नेमके  कारण समजू शकले नाही.

बांधकाम व्यावसायिक नितिन काळे यांनी बारामती मध्ये बांधकाम व्यवसाय  सुरु करुन अनेकांना आर्थिक गंडा घातल्याची चर्चा आहे. एका बँकेच्या अधिका-याला मॅनेज करून नियमबाह्य कर्ज उचलल्याने याची उच्चस्तरीय चौकशी सुरु आहे. बारामतीतील एका पतसंस्थेकडूनही कोट्यावधीचे कर्ज घेऊन ते कर्ज अद्याप अदा न केल्याने ती संस्था अडचणीत आली आहे. दरम्यान, भरणे यांनी केलेली आत्महत्या आर्थिक वादातूनच झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आप्पाराव भरणे यांची आत्महत्या ही पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे. दरम्यान नातेवाईक संतप्त झाले आहेत. त्यांनी सुरवातीला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत घातपाताचा संशय व्यक्त केला. पुढील तपास वालचंदनगर पोलीस करीत आहेत.