जनावरांना चारण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

  जुन्नर : महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा बळी गेल्याची संतप्त भावना व्यक्त करत काले, दातखिळेवाडी येथील ग्रामस्थांनी अधिकारी व कर्मचारी यांना घेराव घालून धारेवर धरले. महावितरणने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी विशाल पानसरे, सचिन दातखिळे यांनी यावेळी केली.

  याबाबत अधिक माहिती अशी, काले (ता. जुन्नर) येथे आदिनाथ सबाजी दातखिळे हे जनावरांना चारण्यासाठी घेऊन गेले होते. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळाने मारुती नायकोडी यांच्या टोमॅटोच्या बागेजवळ विजेच्या खांबावरील तार तुटून टोमॅटोच्या बागेत पडली. या तारेमध्ये  विद्युत प्रवाह सुरू होता. शेतकरी  दातखिळे (वय ५५) यांचा या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

  भोंगळ कारभारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप  

  घटना घडल्यानंतर महावितरणचे कर्मचारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी येण्यास उशीर झाल्याने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत फैलावर घेतले. तसेच संताप व्यक्त केला. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

  दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करा

  जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा बदलल्या असत्या अथवा दोन खांबामधील तारांमध्ये ठिकठिकाणी ब्रॅकेट्स बसवले असते तर ही घटना टळली असती, असे शशिकांत पानसरे यांनी सांगितले. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कुलदीप नायकोडी यांनी केली.