शंभर टक्के कोरोना संसर्ग असलेल्या शेतकरी महिलेचं व्हेंटिलेटरवर असताना झालं सिझेरियन ऑपरेशन, बाळ-बाळंतीण सुखरुप

फुफ्फुसात १०० टक्के कोरोना संसर्ग असलेल्या एका महिलेचे सिझेरियन(delivery of corona patient woman) करण्यात आले. विशेष म्हणजे सिझेरियन करताना ही महिला व्हेंटिलेटरवर होती. सुदैवाने हे सर्व सुरळीत पार पडले आणि या महिलेने सुदृढ बाळाला जन्म दिला आहे.

    बारामती:  बारामतीतील(Baramati) मेहता हॉस्पिटलमध्ये चमत्कार झाला आहे. एचआरसीटी टेस्ट २५ म्हणजेच फुफ्फुसात १०० टक्के कोरोना संसर्ग असलेल्या एका महिलेचे सिझेरियन(delivery of corona patient woman) करण्यात आले. विशेष म्हणजे सिझेरियन करताना ही महिला व्हेंटिलेटरवर होती. सुदैवाने हे सर्व सुरळीत पार पडले आणि या महिलेने सुदृढ बाळाला जन्म दिला आहे. आता बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप आहेत.

    पुणे जिल्ह्यातील देऊळगाव परिसरातील ही २८ वर्षीय गर्भवती शेतकरी महिला ६ एप्रिलला रुग्णालयात दाखल झाली होती. तिच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती आणि ही महिला तापाने फणफणलेली होती. त्यानंतर तीची एचआरसीटी टेस्ट करण्यात आली. त्यात तिच्या फुफ्फुसांना कोरोनाचा १०० टक्के संसर्ग झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन तीन दिवसांतच तिची प्रकृती ढासळली. तिची ऑक्सिजन लेव्हलही ९० पर्यंत आली होती. त्यानंतर तिला श्वास घेण्यासही त्रास होत होता, त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

    ही महिला व्हेंटिलेटवर असतानाच तिला प्रसुतीच्या कळा सुरु झाल्या. अशा स्थितीत तिचे बाळंतपण कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. पण डॉक्टरांच्या टीमने हार मानली नाही. व्हेंटिलेटरवर असतानाच तिचे सिझेरियनचे ऑपरेशन करण्यात आले आणि ते यशस्वीही झाले.

    या महिलेला तीन वर्षांची पहिली मुलगी आहे. तिच्या आधीच्या बाळंतपणातही तिचे सिझेरियनच करण्यात आले होते, त्यामुळे याहीवेळी सिझेरियननेच मुलाची प्रसुती करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

    महिलेची दुसरी प्रसृती उत्तम झाली असून, चमत्कार म्हणजे हे बाळ सदृढ आणि कोरोनामुक्त आहे. बाळाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सध्या या बाळाला आयसीयूत ठेवण्यात आले आहे. या महिलेलाही पुढील काही दिवस आयसीयूत ठेवण्यात येणार आहे. पण या प्रसंगाने या महिलेला धीर आला आहे. ४५ दिवसांच्या उपचारानंतर आता ही महिलाही कोरोनामुक्त झाली असून आता बाळामुळे तिला जगण्याचं बळंही आलं आहे.