‘महाराष्ट्र बंद’च्या आंदोलनात शेतकऱ्यांनीही उतरावे; महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आवाहन

    इंदापूर : लखीमपूर प्रकरणाच्या निषेधार्थ केंद्र शासनाच्या विरोधात उद्या (दि.११) पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या (Maharashtra Bandh) आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला असून, तालुक्यातील सर्व गावांमधील कार्यकर्ते व शेतकऱ्यांनीही या आंदोलनात उतरावे, असे आवाहन या पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितिन शिंदे यांनी एक संयुक्त पत्र प्रसिध्दीसाठी दिले आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या काळ्या कृषी कायद्याच्या विरोधात अनेक महिन्यांपासून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतक-यांना न्याय न देता, उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे भाजपच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतक-यांच्या अंगावर स्वतःची गाडी घालून त्यांना क्रूर पद्धतीने चिरडून टाकले. तेथील शेतकरी आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. अशा हुकूमशाही मोदी सरकारच्या विरोधात सबंध देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या आंदोलन केले जात आहे.

    त्याअनुषंगाने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या सकाळी दहा वाजता गावोगावी बंद पुकारुन संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये मोदी सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरातील गावे बंद करुन या आंदोलनात सहभाग घ्यावा, असे या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.