दुर्दैवी ! मावळात धबधब्याच्या पाण्यात बुडून बाप लेकांचा मृत्यू

    वडगाव मावळ : मावळ तालुक्यात कामशेत येथील कुसगाव खुर्द गावात धबधब्याच्या पाण्यात बुडून दोन मुलांसह वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    पिराजी उर्फ खंडू गणपती सुळे (36), साईनाथ पिराजी सुळे (13) आणि सचिन पिराजी सुळे (10) (इंद्रायणी कॉलनी रा्.कामशेत ) मूळ गाव नांदेड अशी मृत्यू झालेल्या बाप लेकांची नाव आहेत.

    कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी सुट्टी असल्याने पिराजी ते सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोठा मुलगा साईनाथ व सचिन या दोघांना घेऊन जवळच असलेल्या कुसगाव खुर्द येथील धबधबा पाहण्यासाठी गेले होते. त्या परिसरात पाण्याची डबकी तयार झाली असून, ती पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली आहेत.

    पाण्याच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या प्रवाहात सचिन आणि साईनाथ हे दोघे खेळत होते. मात्र, पाण्याचा अंदाज न असल्याने ते गाळात रुतले गेले त्यांना वाचवण्यासाठी पिराजी यांनी उडी मारली. मात्र, अंदाज न आल्याने पिराजी हे गाळात रुतले अखेर दमछाक लागल्याने यात दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कामशेत पोलिस करीत आहेत.