सुनेवर खुनी हल्ला करून सासऱ्याची ट्रकखाली आत्महत्या

गच्चीचा दरवाजा आतून बंद करून त्यांनी सून राधिकाला तू माझ्या घरात राहते काय, असे म्हणत मान आणि केसांना पकडून मागे फिरवले. त्यानंतर तुला जीवे मारतो. तुला खलास करतो, असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या मनगटावर, पंजावर सुरीने सपासप वार केले.

    पिंपरी : माझ्या घरात का राहते, असे म्हणत सासऱ्याने घराच्या गच्चीवर कपडे वाळत घालत असलेल्या सुनेवर सुरीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घराबाहेर येऊन ट्रकखाली उडी मारून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना खेड तालुक्यातील भाम-वाकी येथील संतोषनगरमध्ये घडली.

    पुरुषोत्तम दगडू येवले (वय ७५, रा. संतोषनगर, भाम वाकी, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या सासऱ्याचे नाव आहे. राधिका मोरेश्वर येवले (वय ३५) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या सुनेचे नाव आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फौजदार अमोल डेरे यांनी याबाबत माहिती दिली.

    पुरूषोत्तम येवले हे बीएसएनएल मधून सेवानिवृत्त झाले होते. भाम-वाकी येथे त्यांनी स्वत:चे घर बांधले होते. पत्नी, मुलगा मोरेश्वर, सून राधिका, नातू यांच्यासमवेत ते राहत होते. मात्र, त्यांच्यात घरगुती वाद होते. बुधवारी सकाळी राधिकाचा पती मोरेश्वर कामाला गेला. तर, वयोवृद्ध सासू घरात बसली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी राधिका घराच्या गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेली. यावेळी तिच्या मागून सासरा पुरूषोत्तम सुरी घेऊन आला.

    गच्चीचा दरवाजा आतून बंद करून त्यांनी सून राधिकाला तू माझ्या घरात राहते काय, असे म्हणत मान आणि केसांना पकडून मागे फिरवले. त्यानंतर तुला जीवे मारतो. तुला खलास करतो, असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या मनगटावर, पंजावर सुरीने सपासप वार केले. राधिका ओरडून खाली बसली असता पुरूषोत्तम यांनी तिच्या डोके, कपाळ, गाल, छाती, हाताच्या पोटरीवर वार करून गंभीर जखमी केले. राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून पुरूषोत्तम यांनी पळ काढला. घराबाहेर आल्यावर दुचाकीवरून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु, दुचाकी रस्त्याकडेला उभी करून रस्त्याने जाणाऱ्या एका ट्रकखाली त्यांनी उडी मारली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना चाकण येथील खासगी रूग्णालयात नेण्यात उआले. मात्र, उपचारादरम्यान गुरूवारी (दि. १७) सकाळी त्यांचा मृत्यु झाला. चाकण पोलिस तपास करत आहेत.