जावयाच्या चाकू हल्ल्यात मृत झालेला सासरा निघाला कोरोना पॉझिटिव्ह

जेजुरी : पुरंदर तालुक्यात नाझरे सुपे येथे पत्नीला नांदविण्यास पाठवीत नसल्याच्या कारणावरून जावयाने सासऱ्यावर चाकू हल्ला करुन गंभीर जखमी केले होते.जखमी सासर्‍याला जेजुरी पोलिसांनी पुणे येथील ससुन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.तेथे उपचार चालु असताना सासर्‍याचा मृत्यू झाला.मात्र त्याच्या शवविच्छेदन अहवालानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.खुन करणारा जावई सुरेश सदाशिव भोसले (वय ४०) फरार झाला होता.त्याला आज पोलिसांनी दौंड तालुक्यात सापळा रचुन पकडले.मृत सासर्‍यास कोरोना निघाल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली.खुनी जावयालाही कोरोना चाचणीसाठी पोलिस बंदोबस्तात पुणे येथे पाठवण्यात आले आहे.जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सासरे हे नाझरे सुपे येथे राहत होते.१२ वर्षांपूर्वी त्यांची मुलगी सुरेखा हिचा विवाह दौंड तालुक्यातील मिरवली येथील सुरेश सदाशिव भोसले याच्याशी झाला होता.एक महिन्यांपूर्वी घरात भांडणे व मारहाण झाल्याने सुरेखा माहेरी आली होती शनिवारी (दि ८) सायंकाळच्या वेळी सुरेश भोसले हा पत्नीला नेण्यासाठी नाझरे सुपे येथे आला.यावेळी घरातील सर्वजण शेतात होते.पत्नीला नांदविण्यास पाठवीत नसल्याने बाचाबाची होऊन जावई सुरेश भोसले याने सासर्‍याच्या पोटात चाकू भोकसून तो पळून गेला होता.सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने अधिक तपास करित आहेत.