पगारदार खातेदारांना जिल्हा बँकेकडून पंधरा लाखांचे कॅशक्रेडिट

बँकेच्या पगारदार खातेदारांना जिल्हा बँक पगार तारणावर कॅशक्रेडिट देते.सदर कॅशक्रेडिट मर्यादा पंधरा लाखापर्यंत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस केशवराव जाधव यांनी दिली

  बारामती : बँकेच्या पगारदार खातेदारांना जिल्हा बँक पगार तारणावर कॅशक्रेडिट देते.सदर कॅशक्रेडिट मर्यादा पंधरा लाखापर्यंत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस केशवराव जाधव यांनी दिली.

  ५ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी यांची सहविचार सभा झाली होती. यासभेत कॅशक्रेडिट १५ लाख करावे, यासह विविध मागण्या शिक्षक संघटना प्रतिनिधींनी केल्या होत्या. त्यानुसार कॅशक्रेडिट १५ लाख करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.याचा लाभ जिल्ह्यातील शिक्षकांना होणार असून शिक्षकांच्या आर्थिक गरजा पूर्ततेसाठी मदत होणार असल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या निर्णयाचे बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट) नेते महादेव गायकवाड,अध्यक्ष हनुमंत शिंदे,सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड,यांनी स्वागत केले.

   

  शिक्षक संघटनांनी जिल्हा बँकेकडे विविध मागण्या केलेल्या आहेत.उर्वरित मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ.

  रमेश थोरात-अध्यक्ष,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

   

  “पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्राथमिक शिक्षकांच्या जिव्हाळ्याची बँक आहे. जिल्हा बँकेने घेतलेला निर्णय शिक्षक हिताचा आहे.त्याचे आम्ही स्वागत करतो.उर्वरित मागण्या मान्य करून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचेकडे पाठपुरावा करणार.”

  केशवराव जाधव – सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ