‘मोफत बेड’ साठी पैसे घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; महापौरांचा आयुक्तांना आदेश

ऑटो क्लस्टर कोवीड हॉस्पिटल कोणाच्या बापाचे नाही. बेडसाठी पैसे घेणाऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल करावा. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. कोणाला माफ करणार नाही. रुग्णांकडून पैशांची मागणी करत ठेकेदार महापालिकेचे बदनामी करत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. पैसे मागणाऱ्याला किती दिवसात शोधणार हे आयुक्तांनी सांगावे अन्यथा आयुक्तांनी त्यांच्या दालनात जावू नये.

    पिंपरी: ऑटो क्लस्टर येथील कोरोना हॉस्पिटल कोणाच्या बापाचे नाही की कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. स्पर्श संस्थेला महापालिका पैसे मोजते. मोफत उपचाराची सोय असलेल्या बेडसाठी एक लाख रुपये घेणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, असा आदेश महापौर उषा ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिला. ऑटो क्लस्टर, जम्बो कोविड हॉस्पिटलचे संचलन महापालिकेने स्वत: करावे, असे आदेशही त्यांनी दिले.

    चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू केले असून स्पर्श ही खासगी संस्था त्याचे संचलन करते. मोफत उपचार होत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला आयसीयू बेड देण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड, विकास डोळस यांनी उघडकीस आणला. त्यावर महासभेत पाच तास चर्चा झाली. नगरसेवकांनी ऑटो क्लस्टर, जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रारींचा पाढा वाचला. मोफत उपचारांसाठी पैसे घेणाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. सर्वपक्षिय नगरसेवकांच्या भावना समजून घेतल्यानंतर महापौर ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना कडक शब्दांत आदेश दिले.

    ऑटो क्लस्टरमध्ये पैसे घेऊन बेड उपलब्ध करुन दिल्याचा प्रकार उघडकीस आणणाऱ्या नगरसेवकांचे मी अभिनंदन करते. ऑटो क्लस्टर कोवीड हॉस्पिटल कोणाच्या बापाचे नाही. बेडसाठी पैसे घेणाऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल करावा. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. कोणाला माफ करणार नाही. रुग्णांकडून पैशांची मागणी करत ठेकेदार महापालिकेचे बदनामी करत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. पैसे मागणाऱ्याला किती दिवसात शोधणार हे आयुक्तांनी सांगावे अन्यथा आयुक्तांनी त्यांच्या दालनात जावू नये.
    ऑटो क्लस्टर, जम्बो हॉस्पिटल महापालिकेच्या ताब्यात घ्यावे. मनुष्यबळ उपलब्ध करुन महापालिकेने ते चालवावे. त्यासाठी डॉक्टरांची टीम करावी. महापालिका पैसे देत असताना ऑटो क्लस्टर, जम्बो मध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ताटेखालचे मांजर करणे चुकीचे आहे. स्पर्श व्यवस्थापनाचे डॉ. अमोल होळकुंदे, ‘मेडब्रो’चे डॉ. संग्राम कपाले, डॉ. प्रीती व्हिक्टर यांना हाकलून द्यावे असा आदेश महापौरांनी दिला.

    जी चुकीचे कामे माझ्या नजरेसमोर आली त्यावर आजपर्यंत कारवाई केली. यापुढेही करणार आहे. स्पर्शमध्ये पैसे घेऊन बेड मिळवून देणऱ्यांवर निश्चितपणे गुन्हा दाखल केला जाईल. पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती करुन सत्य समोर आणले जाईल. स्मशानभूमीत पैसे घेत असल्याची तक्रार आल्यानंतर त्या व्यक्तीची बदली केली. जम्बो हॉस्पिटल, वायसीएममधील फार्मासिस्टवर आरोप झाल्यानंतर त्यांचीही बदली केल्याचा खुलासा आयुक्त राजेश पाटील यांनी केला आहे.