व्याजाने घेतलेल्या पैशापोटी जमीन लाटणाऱ्या सहा खासगी सावकारां विरुद्ध गुन्हा दाखल

बारामतील नागरिकांनी सावकारांच्या दडपशाहिला न घाबरता पुढे यावे तर सावकारांनी व्याजाने पैसे देणे बंद करावे येथून पुढे अवैद्य वसुली होणार नाही, कारवाई झालेल्या सावकारांच्या विरोधात कोणाची तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

बारामती: दिलेल्या कर्जाच्या मोबदल्यात अव्वाच्या सव्वा व्याज लावून या कर्जापोटी जमिन लिहून घेतल्यावरही त्रास देणाऱ्या सहा सावकारां विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव बिटू सांगळे,आशा महादेव सांगळे, मल्लेश कदरापूरकर (रा. पिंपरी, पुणे),बिभिषण ढोले, भास्कर काशिनाथ वणवे, दत्तात्रय राजाराम वणवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत नामदेव रामचंद्र ढोले (वय ५०,रा.लाकडी, ता.बारामती) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ढोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१६ मध्ये ढोले यांची आई आजारी असल्याने बारामती शहरातील जळोची येथील सांगळे यांच्याकडून दरमहा १० टक्के व्याजाने १ लाख रुपये घेतले होते.या बदल्यात लाकडी येथील गट नं.९५ मधील एक एकर जमिन फिर्यादीचे भाऊ अशोक रामचंद्र ढोले यांनी सांगळे यांना लिहून दिली होती. हा दस्त बारामतीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात झाला. सांगळे यांनी १ लाख रुपयांच्या बदल्यात ३ लाख ६५ हजार रुपये व्याज लावले.त्या बदल्यात अशोक ढोले यांच्या नावे असलेली दीड एकर जमिन आशा सांगळे यांच्या नावे करून घेण्यात आली.२०१६ ते २०१८ या कालावधीत बिटू सांगळे यांना फिर्यादीकडून ३२ लाख रुपये व्याज व मुद्दलीच्या बदल्यात देण्यात आले. तरीही सांगळेंनी आणखी पैशाचा तगादा सुरुच होता. तो भागविण्यासाठी सांगळे याच्याच मध्यस्थीने बिभीषण जमसिंग ढोले यांच्या साथीने जमिन गट क्र. ९४ मधील दोन एकर जमिन पिंपरीतील सावकार मल्लेश बसलिंगप्पा कदरापूरकर यांना गहाण ठेवून त्यांच्याकडून ४ लाख ८५ हजार रुपये फिर्यादीने बॅंक खात्यामार्फत २७ आॅगस्ट २०१८ रोजी घेतले. सरकारी मूल्यानुसार तेवढ्याच किमतीचा कागद करत उरलेली ५ लाख १५ हजारांची रक्कम कदरापूर याने फिर्य़ादीला व्याजाने देत खरेदी खत करून घेतले. कदरापूरकर यांच्याकडून पैसे आल्याने सांगळे यांनी लिहून घेतलेले खरेदीखत पलटून देण्यासाठी फिर्यादी सांगळे यांच्याकडे गेले असता, सांगळे याने खरेदीखत पलटून देण्यास नकार दिला. त्यामुळे कदरापूर यांच्याकडून घेतलेल्या रकमेला व्याज देण्याची वेळ फिर्य़ादीवर आली.कदरापूर यांनीही फिर्यादीकडून १० लाखांच्या बदल्यात २२ लाख रुपये वसूल केले. ही रक्कम देण्यासाठी फिर्यादीची ६.५ एकर शेतजमीन रायचंद पांडूरंग वणवे व त्यांचा भाऊ यांना ३६ लाख ९० हजार रुपयांना विकण्यात आली ,त्यातील २२ लाख रुपये सांगळे याने घेतले. तर १४ लाख ९० हजार रुपये कदरापूरकर यांनी घेतले. त्यानंतरही सांगळे याने दोन तर कदरापूरकर याने २० लाखांच्या व्याजाची मागणी करत ही रक्कम दिली तरच आम्ही जमिन परत करू, अशी धमकी देत होते.शासकिय अधिकाऱ्यांना हाताशी धरून व आर्थिक तडजोड करत या सावकारांनी हा व्यवहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.तसेच वारसांची सहमती नसताना ही जमिन लिहून घेण्यात आली. जमिन गट क्रमांक ९५ मधील २० गुंठे जमिन प्रभाकर पांडूरंग भांड (रा.बोरी,ता.इंदापूर) यांना विकण्यात आली आहे. त्यावर बँक आॅफ महाराष्ट्रचा कर्जाचा बोजा असताना आर्थिक ताकदीच्या जोरावर ती विकत सरकारची फसवणूक करण्यात आली. सावकारांच्या चक्रात अडकलेल्या फिर्य़ादीला सावकारांनी आणखी त्रास दिला.तसेच त्यांच्या मुलाला धमक्या देण्यात आल्या.सावकारांकडून वारंवार मारहाण, शिविगाळ केली जात असल्याने अखेर कंटाळून ढोले यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी उपनिरीक्षक दिलीप सोनवणे अधिक तपास करत असून बारामतील नागरिकांनी सावकारांच्या दडपशाहिला न घाबरता पुढे यावे तर सावकारांनी व्याजाने पैसे देणे बंद करावे येथून पुढे अवैद्य वसुली होणार नाही, कारवाई झालेल्या सावकारांच्या विरोधात कोणाची तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.