बोगस एफडीआर सादर केल्याप्रकरणी तीन ठेकेदारांच्या विरोधात गुन्हे दाखल

आरोपीने टीजेएसबी बँक आळंदी शाखेचा २ लाख ५० हजार रुपयांचा खोटा आणि बनावट एफडीआर महापालिकेला सादर केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सावर्डे करीत आहेत.

    पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांनी बोगस एफडीआर सादर केला. याप्रकरणी तीन ठेकेदारांच्या विरोधात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनचे संदीप सुखदेव लोहार (रा. तळेगाव दाभाडे), भैरवनाथ कन्स्ट्रक्शनचे नंदकुमार मथुराम ढोबळे (वय३४, रा. रुपीनगर), दत्तकृपा इंटरप्राईजेसचे दत्तात्रय महादेव थोरात (वय ३९, रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदारांची नावे आहेत. याबाबत प्रवीण सोपानराव बागलाणे (वय ५७) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पहिल्या प्रकरणात त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनचे संदीप सुखदेव लोहार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे डांगे चौक ते बिर्ला हॉस्पिटल या रस्त्याच्या फुटपाथवर रंगीत पेव्हींग ब्लॉक बसवण्याचे काम घेतले. यासाठी आरोपीने एक कोटी २४ लाख ५३ हजार ४३१ रुपयांची निविदा भरली. त्यासाठी आरोपीने टीजेएसबी बँक आळंदी शाखेचा २ लाख ५० हजार रुपयांचा खोटा आणि बनावट एफडीआर महापालिकेला सादर केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सावर्डे करीत आहेत.

    दुसऱ्या प्रकरणात भैरवनाथ कन्स्ट्रक्शनचे नंदकुमार मथुराम ढोबळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रभाग क्रमांक सहा मध्ये लांडगे वस्ती, सद्गुरूनगर, चक्रपाणी वसाहत, महादेव नगर व परिसरामध्ये पावसाळी गटारांची सुधारणा करण्याच्या कामासाठी ३० लाख ३५ हजार ७८३ रुपयांची निविदा भरली. त्यासाठी आरोपीने टीजेएसबी बँक आळंदी शाखेचे ६१ हजार आणि दहा लाख ३७ हजार रुपयांचे खोटे बनावट एफडीआर सादर केले. याबाबतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पतंगे करीत आहेत.

    तिसऱ्या प्रकरणात दत्तकृपा इंटरप्राईजेस दत्तात्रय महादेव थोरात यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अ प्रभाग क्रमांक सहा मधील भाटनगर हिंदू स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्याच्या कामाची ८३ लाख १२हजार सतरा रुपयांची निविदा भरली. त्यासाठी आरोपीने आयसीआयसीआय बँक पंचशील टेकपार्क विमाननगर शाखेची १६ लाख ८० हजार व एक लाख ६७ हजार रुपयांची बनावट बँक गॅरंटी तयार केली. ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला सादर केली. याबाबत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.