प्रतिबंधात्मक क्षेत्रात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल

                                                                                                                                                                                                                    भिमाशंकर : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीतील शिनोली, गिरवली येथे कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने प्रतिबंधात्मक क्षेत्र घोशित केले. या गावांतील होम क्वारंटाइन केलेले व विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तिंवर घोडेगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.  

शिनोली (उगलेवाडी) येथील भानुदास बाळू बो-हाडे (वय-४०) यास पोलीस पाटील यांनी होम क्वारंटाइन राहणे बाबत नोटीस बजावली असताना देखिल विनाकारण शिनोली येथील बस स्थानक परीसरात फिरत होते. तर दुसऱ्या घटनेतील सुधिर जनार्दन सैद (वय- ४२. रा. गिरवली, कृष्णवाडी) प्रतिबंधात्मक क्षेत्र असलेल्या हद्दीतून विनापरवाना संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून चिंचोली गावचे बसस्थानक परीसरात फिरत होते.  

या दोघांना कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याचा संभव आहे याची जाणीव असतानाही जिल्हाधिकारी पुणे यांचे संचारबदी आदेशाचे उल्लंघन केले. तसेच इतरांचे जिवीतास धोकादायक असलेल्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होईल असे कृत्य केल्याने त्यांच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार सहायक फौजदार युवराज भोजणे व पोलीस हवालदार राजाराम भोगाडे यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस जवान युवराज भोजणे, एम. एम. झनकर करत आहे.