माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा २७५० रुपये अंतिम दर जाहीर; बाळासाहेब तावरे यांची माहिती

माळेगाव साखर कारखान्याच्या वतीने सन २०२०-२०२१ च्या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन २७५० रुपये अंतिम ऊस दर जाहीर करण्यात आला.

    माळेगाव : माळेगाव साखर कारखान्याच्या वतीने सन २०२०-२०२१ च्या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन २७५० रुपये अंतिम ऊस दर जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे (Balasaheb Taware) आणि कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप (Rajendra Jagtap) यांनी दिली.

    संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. याबाबत माहिती देताना अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी सांगितले की, गाळप हंगाम सन २०२०-२०२१ मध्ये तुटून आलेल्या उसाला प्रतिटन २७५० रुपये अंतिम भाव देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, गेटकेन धारकांना २६०० रुपये प्रतिटन ऊस दर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने सभासदांसाठी यापूर्वीच २४५९ रुपये एफआरपी जाहीर केली आहे. त्यानंतर खडकी साठी शंभर रुपये अनुदान देण्यात आले होते. तर उर्वरित १९१ रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

    २०२०-२१ च्या गळीत हंगामात ७ लाख ८७ हजार मेट्रिक टन सभासदांचा तर ४ लाख ८१ हजार मेट्रिक टन गेट केन धारकांचा ऊस गाळप करण्यात आला होता. कारखान्याच्या आतापर्यंतच्या इतिहासात या गळीत हंगामातील हे गाळप उच्चांकी मानले जात आहे. या हंगामात १४ लाख २५ हजार साखर पोती उत्पादित केली होती. कारखान्याने या हंगामात 6 कोटी वीस लाख युनिटची वीज निर्मिती केली आहे. तर मद्यार्क निर्मिती प्रकल्पातून एक कोटी 58 लाख लिटरची निर्मिती केली असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप आणि उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना दिली.