विजेच्या लपंडावाने व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान , नागरिक हैराण

दौंड :  गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे पाटस नागरीक हैराण झाले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने व्यावसायिक व नागरिक हैराण झाले आहेत.पाटस भागासाठी वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र उप-विभाग (सब-स्टेशन) असताना देखील उजेड-अंधाराचा खेळ या परिसरातील नागरिकांचा पिच्छा सोडण्यास तयार नाही. सर्वांत आश्‍चर्याची बाब म्हणजे एवढा त्रास होत असताना देखील महावितरणचे अधिकारी मात्र कोणतीही समस्या नसल्याचे सांगत आहेत.

-भरमसाठ वीज बिल भरुनही वीज पुरवठा खंडित
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने भरमसाठ वीज बिल भरुनही कधीही वीज पुरवठा खंडित होईल अशी नागरिकांच्या मनात कायम भीती असते, दौंड तालुक्यात वीज यंत्रणेची दैना उडाली वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. पाटस येथील मंगळवार (ता.१८) रोजी दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच बुधवार (ता.१९) रोजी दिवसभरात एक ते दोन तासांसाठी चार ते पाच वेळा वीज पुरवठा खंडित केला होता. विजेच्या लपंडावामुळे महिलांसह कार्यालयीन कामकाज तसेच बँकांतील आर्थिक व्यवहारदेखील खोळंबतात दिसत आहेत. नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

– वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे
पावसाळ्याच्या दिवसात झाडांच्या फांद्या वीजतारांमध्ये अडकून किंवा फांद्या तुटल्याने शॉर्टसर्किट होतो. शिवाय वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यास रोहित्रात बिघाड, फ्यूज जाणे, डिस्क इन्सुलेटर किंवा पिन इन्सुलेटर पंक्‍चर होणे, चिनी मातीचे इन्सुलेटर गरम होऊन त्यात पाणी गेल्याने तडे पडून, सर्व्हिस वायर व जंपरवर कार्बन चढणे, सर्व्हिस वायर जोडणी ढिली होणे यासारख्या कारणांमुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असतो. ‘महावितरण’ला हे सारे कारणे माहीत असताना देखील यातील दुरुस्ती करण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.

– वीजपुरवठा सुरळीत सुरु करा
विजेच्या लपंडावामुळे दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायतची सार्वजनिक पाणी पुरवठा योजना बंद राहिल्याने पाणीटंचाई निर्माण होत आहे. याबाबत पाटस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शिवाजी ढमाले यांनी महावितरणचे काम करण्यासाठी दोन तासांची परवानगी (परमिट) घेऊन दिवसभर वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचे आरोप केले असून येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न सुरू झाल्यास ग्रामस्थांसह आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दौंड वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.

पाटस परिसरात व्यावसायिक व घरगुती वीजग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक ग्राहक नियमित वीजबिलही भरतात. तरीही रहिवाशांना अखंडित वीज मिळत नाही. गेल्या महिनाभरापासून विजेचा लंपडाव सुरू असून सकाळी आठ वाजता वीज गेल्यास संध्याकाळपर्यंत वीज येत नाही. आठवड्यातून दोन ते तीन दिवस वीजपुरवठा खंडित का केला जातो? तसेच इतर दिवशी तासंतास वीजपुरवठा खंडित का केला जातो? प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. वीज नसल्याने कामेही खोळंबतात. याबाबत महावितरणकडे अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, असा आरोप रहिवाशांनी केला. वीजपुरवठा खंडित होण्यामागच्या कारणांची ठोस माहिती दिली जात नाही. त्यामुळे महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात स्थानिक रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे समजते.

“पाटस येथील रोहित्रांचा भार कमी करण्याचे काम युध्द पातळीवर चालू होते, जवळजवळ सर्व कामे पूर्ण झाली आहेत, पुढील काळात जास्त वेळ वीज पुरवठा खंडित होणार नाही.”
– वैभव पाटील,उप-कार्यकारी अभियंता, महावितरण दौंड