निर्बंध असतानाही बर्थ डे पार्टी करणे भोवले; अनेकांवर गुन्हे दाखल

    शिक्रापूर : हिवरे कुंभार ता. शिरुर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लादलेले नियम तोडून वाढदिवस साजरा केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विठ्ठल जाधव, सलीम आत्तार, रेवलनाथ जाधव, मोहन टाकळकर, विजय शिर्के यांसह तब्बल सतरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
    हिवरे कुंभार ता. शिरुर येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेले नियम झुगारून काही युवकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी मिळाली. त्यांनतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस शिपाई जयदीप देवकर, राहुल वाघमोडे, पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे यांसह आदींनी या ठिकाणी जाऊन चौकशी केली. गावातील रॉयल केक्स दुकानासमोर अनेक युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून मास्कचा वापर टाळून समूहाने गावातील विठ्ठल जाधव या युवकाचा वाढदिवस साजरा करत पार्टी केल्याचे निदर्शनास आले.
    याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक श्रीमंत सर्जेराव होनमाने (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी विठ्ठल विलास जाधव, सलीम महेबूब आत्तार, रेवलनाथ शहाजी जाधव, मोहन आनंदा टाकळकर, विजय किसन शिर्के यांसह अन्य बारा युवक (सर्व रा. हिवरे कुंभार ता. शिरुर जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काशिनाथ गरुड हे करत आहे.
    कोरेगाव भीमा व करंदीच्या प्रकरणाबाबत पोलीस गप्प का ?
    शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक ठिकाणी वाढदिवस, लग्न सोहळे, उद्घाटने यांसह इतर कार्यक्रमात गर्दी केली होती. याचे नियम मोडल्याचे कारण दाखवत गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांच्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जात आहे. मागील महिन्यात कोरेगाव भीमा, करंदी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करुन मास्कचा वापर न करता कार्यक्रम केल्याची घटना घडली होती. तसेच शिरुर तहसीलदार लैला शेख यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनही पोलिस गप्प का असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.