पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह 30 ते 40 जणांवर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह 30 ते 40 जणांवर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सरकारविरोधात आंदोलन करत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

    याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात चंद्रकांत पाटील, कसबा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार व भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, स्वरदा बापट, राजेंद्र मानकर यांच्यासह 30 ते 40 यांच्यावर 188, 269, 270, 51(ब) 37 (1), 37(3) 135 नुसार गुन्हा नोंद झाला आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. दरम्यान, भाजपने कसबा मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करत मंदिर उघडे करण्यासाठी सरकार विरोधात आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी मोठमोठ्याने घोषणाबाजी केली. कोरोना नियमांचे पालन न करता त्याचे उल्लंघन केले.

    तसेच रोगाचा प्रसार होऊ नये याची खबरदारी न घेता स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण केला आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान भाजपच्या वतीने आंदोलन करण्याबाबत परवानगी मागितली होती. पण, आंदोलनाला परवानगी नाकारत त्यांना 149 ची नोटीस पोलिसांनी दिली होती. तरीही त्यांनी आंदोलन करत त्याठिकाणी गर्दी जमवली होती.