बारामतीत कथित बाळू मामा भक्त मनोहर मामा भोसलेसह तिघांवर गुन्हा दाखल

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कॅन्सर रुग्णास बरे करण्याची भूलथाप मारुन, बारामती शहरातील एकाची २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी बाळू मामाचा कथित भक्त मनोहर मामा भोसले (रा.उंदरगांव ,ता. करमाळा ,जि सोलापुर) याच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत शशिकांत खरात (रा.साठेनगर, कसबा बारामती ता बारामती जि पुणे) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार खरात यांच्या वडीलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे.त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसले या भोंदुबाबाच्या सावंतवाडी, गोजूबावी( ता बारामती जि पुणे )मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला. तक्रारदार यांच्या वडीलांचा गळयावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला.

    तसेच विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकुण २ लाख ५१,५०० रुपये त्यांचे व त्यांच्या वडीलांच्या जिवाचे बरे वाईट होईल, अशी भिती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे. पैसे परत मागितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

    याबाबत खरात यांच्या तक्ररीवरून आरोपी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगांव ता. करमाळा जि.सोलापुर), विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा , ओंकार शिंदे यांच्याविरूध्द भा.द.वि. कलम, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटण कायदा व औषधे व चमत्कारी उपाय (आक्षेपार्ह जाहीरात) अधिनियमान्वये बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करून मनोहर मामा भोसले व त्याचे साथीदारांनी कोणाची फसवणूक वा भिती घालून पैसे देण्यास भाग पाडले असेल. त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.