पुण्यातील सॅनिटायझर कंपनीतील आग प्रकरण; मृत्यू झालेल्या 15 महिलांची ओळख पटेना

पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत होरपळून मुत्यूमुखी पडलेल्या 18 कामगारांमध्ये 15 महिलांचा समावेश आहे. मात्र आगीत होरपळून कोळसा झालेल्या अवस्थेतील मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, त्या कंपनीत आगीचा भडका उडाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी एकच धावपळ झालेल्या कामगारांपैकी चार जणांचे मृतदेह एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत सापडले आहेत.

  पुणे : पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत होरपळून मुत्यूमुखी पडलेल्या 18 कामगारांमध्ये 15 महिलांचा समावेश आहे. मात्र आगीत होरपळून कोळसा झालेल्या अवस्थेतील मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, त्या कंपनीत आगीचा भडका उडाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी एकच धावपळ झालेल्या कामगारांपैकी चार जणांचे मृतदेह एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत सापडले आहेत.

  एकमेकांना वाचवण्यासाठी धाव घेउन ते परस्परांना बिलगले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आता कामावर जाताना कोणते कपडे किंवा दागिने घातले होते या माहितीच्या आधारावरच मृतदेहांची ओळख समजू शकणार आहे. आगीत तब्बल 18 जणांचा हरपळून मृत्यू झाला आहे.यात बहुतांश मृत या महिला आहेत. या सर्व महिला आजुबाजुच्या परिसरातून या कंपनीत कामाला येत होत्या.

  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

  दरम्यान, या कंपनीत आठ दिवसांपूर्वीच एक छोट्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हाच काळजी घेण्याची गरज होती. जर तेव्हाच काळजी घेतली गेली असती. तर आज अशी दुर्घटना घडली नसती. त्यामुळे मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

  गृहमंत्री वळसे-पाटील, सुप्रिया सुळे यांची भेट

  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, रुपाली चाकणकर होते. आग कशामुळे लागली, याला जबाबदार कोण यासाठीच्या चौकशीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होईल. चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

  हे सुद्धा वाचा