इमारतीत गोळीबाराचा थरार..! घरफोडी करून जाणाऱ्या गुन्हेगाराने पाठलाग करणाऱ्या तरुणावर झाडली गोळी

चोरी केल्यानंतर तो खाली येत होता. खाली येत असताना त्याला अवेजने पाहिले आणि पायऱ्यांवर त्याचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी त्याने अवेजवर गोळीबार केला.

    पुणे : नाशिकच्या जेलमधून बाहेर आलेल्या गुन्हेगाराने पुण्यात चोरी करताना पाठलाग करणाऱ्या तरुणावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. पण, जखमी अवस्थेत देखील त्या धाडसी तरुणाने त्याला पकडले आहे. मध्यवस्तीत भरदिवसा हा थरार घडला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.

    अवेज सलीम अन्सारी (वय 23) हा जखमी झाला आहे. पोलिसांनी विठलं वामन बोळे (रा. हिंगणे मळा, जळगाव) याला पकडले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी कुटुंब राष्ट्रभूषण येथील खडकमाळ येथील एका इमारतीत राहतो. दरम्यान दुपारी जेवण केल्यानंतर ते टेरेसला जातात. त्यानुसार टेरेसला गेले होते. घराचा दरवाजा उघडा होता. यावेळी विठलं हा घरात शिरला आणि त्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरी केल्यानंतर तो खाली येत होता. खाली येत असताना त्याला अवेजने पाहिले आणि पायऱ्यांवर त्याचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी त्याने अवेजवर गोळीबार केला. एक गोळी त्याला हाताला लागली. तरीही त्याने बोळेला पकडले. भरदिवसा गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.

    काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर

    विठलं हा कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहाबाहेर बाहेर आला आहे. नाशिकच्या जेलमधून तो बाहेर आला असून, जळगावात त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे.