पहिले अतिक्रमण हटवा मगच व्यापाऱ्यांवर निर्बंध घाला : श्रीचंद आसवाणी

    पिंपरी : लॉकडाऊनमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. पार्किगच्या नियमांप्रमाणे (पी१/पी२) दुकाने उघडी ठेऊन व्यापाऱ्यांचे आणखी नुकसान होईल. ‘ब्रेक द चेन’च्या नियमांनुसार सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. पी१/पी२ मुळे आठवड्यातून दोनच दिवस दुकाने सुरु ठेवावी लागतील, यास पिंपरी मर्चंट फेडरेशनचा विरोध आहे, अशी माहिती अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी दिली.

    मंगळवारी (दि. ८) श्रीचंद आसवाणी यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी नीरज चावला, प्रकाश रतनानी, सुनील चुगाणी तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त मंचक हिप्पर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी पिंपरी कॅंम्प परिसरात पाहणी दौरा केला. यावेळी व्यापारी प्रतिनिधींनी आपल्या अडचणी सांगितल्या. या भागातील अतिक्रमण, बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे पथारीवाले, फेरीवाले यांना प्रथम हटवा अशी व्यापाऱ्यांनी मागणी केली.

    कोरोनाचे सर्व नियम पाळूनच व्यापारी दुकाने सुरु ठेवत आहेत. तरीही पोलिस आणि मनपाचे अधिकारी विनाकारण दंडात्मक कारवाई करतात अशीही व्यापाऱ्यांची तक्रार आहे.

    गर्दीच्यावेळी ग्राहकांना वाहने लावण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे वाहतुकीस अडथळा येतो. यासाठी साई चौकातील सबवेच्या पलीकडील मोकळ्या जागेचा वापर करता येईल का? याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी माहिती घेतली व पाहणी केली. कोरोनाच्या दुसऱ्या  लाटेवर बहुतांशी नियंत्रण मिळवण्यास यश आले असून, लॉकडाऊन पूर्णत: उठवण्यासाठी आवश्यक ती दक्षता व्यापारी तसेच ग्राहकांनीही घ्यावी व नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन पिंपरी मर्चंट फेरडेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी केले.