मासेमारीचा गाेरखधंदा : उजनीतील मत्स्यसंवर्धनाला हरताळ

-बोटुकली शिकारीला बळी : कार्प माशांची पिल्ले चिलापीच्या भक्ष्यस्थानी

शैलेश काटे,इंदापूर : माशांचा तुटवडा होऊ नये म्हणून मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात माशांचा आडत व्यापाऱ्यांनी वर्गणी करुन दहा लाख मत्स्यबीज उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सोडले होते. त्यातील बहुतांशी बोटुकली अवैध शिकारीला बळी पडल्याने मत्स्यसंवर्धनाच्या हेतूला हरताळ फासला गेला.

उजनी पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ ते वर्षात मत्स्यबीज सोडले गेले नाही. चिलापी माशांच्या आक्रमणामुळे रोहू, कटला, वांब, मृगल, सरपनेस, शिंगाडा यासारखे मागणी असणाऱ्या कार्प जातीच्या माशांची पिल्ले चिलापीच्या भक्ष्यस्थानी पडू लागले. मासेमारांच्या जाळ्यात चिलापी मासा मोठ्या प्रमाणात सापडू लागला.

जुलै ते ऑगस्ट या महिन्यांच्या दरम्यान माशांचा प्रजननाचा कालावधी असतो. पावसाळ्यात नदी, धरणामध्ये पाणी वाढण्याच्या सुमारास पाण्याच्या प्रवाहाबरोबर येणारे हे मासे मासेमारांच्या जाळ्यात सापडतात. त्यामुळे माशांचे प्रजनन होऊ शकत नाही. नदी, धरणांमध्ये पाणी साठल्यानंतर किमान दोन ते तीन महिने मासे सापडत नाहीत. सुदैवाने वाचलेल्या माशांची पिल्ले मोठी होण्यास लागणाऱ्या अवधीमुळे मत्स्यव्यवसायात मंदी येते. उजनीसारख्या मत्स्य व्यवसायासाठी राज्य व परराज्यात प्रसिद्ध असणाऱ्या विस्तीर्ण जलाशयात माशांचा तुटवडा जाणवू लागतो.

-दंडात्मक कारवाईची तजवीज

इंदापूर तालुक्यातील मोठी उलाढाल असणाऱ्या इंदापूर व भिगवण येथील मासळी बाजारात जुलै ते ऑगस्ट दरम्यान माशांची अावक कमी हाेते. िकमान दहा महिने त्याचे सावट राहते. तशी परिस्थिती येऊ नये, याकरिता गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात इंदापूर व भिगवण येथील माश्ाांच्या आडत व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पुढील वर्षापासून जुलै ते ऑगस्ट या काळात मासेमारी कटाक्षाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मासे पकडल्याचे आढळून आले तर दंडात्मक कारवाई करण्याची तजवीज करण्यात आली होती.

-विमानाने मागविले होते मत्स्यबीज

उजनी पाणलोट क्षेत्रात दहा लाख मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी इंदापूर व भिगवण येथील माश्ाांच्या आडत व्यापाऱ्यांनी वर्गणी करुन नोव्हेंबर महिन्यात विमानाने मत्स्यबीज मागविले होते. भिगवणपासून तरटगावपर्यंत सहा ठिकाणी पाणलोट क्षेत्रात ते सोडण्यात आले होते. कार्प जातीचे मासे मत्स्यबीज सोडल्यानंतर ते विक्रीयोग्य होण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागतो. मात्र माशांच्या पिल्लांची शिकार करणाऱ्यांनी तेवढी ही संधी मिळू दिली नाही. यातील बहुतांश बोटुकली या शिकाऱ्यांना बळी पडली.

-कोरोना काळात शिकाऱ्यांची चंगळ

कोरोना साथीच्या कालावधीत या शिकाऱ्यांची चंगळ झाली. सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळात अडीच महिने परवानगी असूनही इंदापूरचा मासळी बाजार बंद होता. मासेमारी ठप्प झाल्याचा फायदा या शिकाऱ्यांनी उठवला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मासळी बाजार सुरु झाला.मात्र आवक निम्म्याने घटली. पाच टन आवक होऊ लागली. उलाढाल दहा लाख रुपयांपर्यंत खालावली. त्यात ही जे कार्प जातीचे मत्स्यबीज सोडले होते. ते नगण्य स्वरुपात बाजारात पोहचू लागले. चिलापी व इतर मासे माशांचाच भरणा होत गेला.