मशीन खरेदीत फसवणूक झालेल्या युवकाचे साडेपाच लाख रुपये मिळाले परत

शिक्रापूर :शिक्रापूर ता. शिरूर येथील एका युवकाला पेपर पिशवी बनविण्याची मशीन खरेदीसाठी कंपनीची माहिती देऊन वारंवार फोन करून कंपनीच्या बँक खात्यामध्ये साडेपाच लाखाहून अधिक पैसे भरून घेत युवकाची फसवणूक झाल्याची घटना घडली होती.याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास शिक्रापूर पोलिसांनी केल्याने फसवणूक झालेले साडेपाच लाख रुपये सदर युवकाला परत मिळाले आहेत. यामुळे शिक्रापुरातील मांढरे परिवाराचा आनंदाला पारावर उरला नसून त्यांनी शिक्रापूर पोलिसांचा सत्कार करत आभार मानले आहे.

नेमके प्रकरण काय ?
शिक्रापूर ता. शिरूर येथील कैलास मांढरे या युवकाला व्यवसायासाठी पेपर पिशवी बनविण्याची मशीन खरेदी करण्यासाठी त्याने नेट वरून वेगवेगळ्या मशीन कंपन्यांची माहिती घेतली त्यांनतर मांढरे याने सदर कंपनीच्या नंबरवर संपर्क करून मशीन बाबत माहिती घेतली त्यांनतर सदर कंपनीच्या एका महिलेचा फोन आला त्यांनी मांढरे यांना मशीन बुकिंगसाठी वीस हजार रुपये कंपनीच्या खात्यावर भरण्यास सांगितले, त्यांनतर पुन्हा मशीनची किंमत दहा लाख रुपये असून पन्नास टक्के रक्कम भरण्यास सांगितले होते, त्यावेळी मांढरे यांनी ऑक्टोबर २०१९ एका बँकेतून कर्ज घेऊन पाच लाख पन्नास हजार रुपये पुन्हा सदर कंपनीच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर केले त्यानंतर मांढरे यांनी वारंवार कंपनीला फोन केला असता अनेक दिवस उलटून देखील सदर मशीन कंपनीचा फोन आला नाही आणि संपर्क देखील झाला नाही, नंतर मांढरे यांनी दिल्ली येथील कंपनीच्या बँक खात्याची माहिती घेतली असता बँक खातेदेखील बंद झाल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे मांढरे यांच्या निदर्शनास आले, याबाबत कैलास किसन मांढरे रा. शिक्रापूर बोरमळा ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दिल्ली येथील सदर कंपनीच्या अज्ञात व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व पोलीस नाईक विलास आंबेकर हे करत असताना शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे, पोलीस नाईक संदीप जगदाळे यांनी दिल्ली येथे जात सदर कंपनीमध्ये जाऊन योग्य तपास केला त्यावेळी मांढरे यांचे फसवणूक झालेले पाच लाख सत्तर हजार रुपये त्यांच्या खात्यावर परत करण्यात आले, त्यामुळे मांढरे यांचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला त्यानंतर मांढरे यांनी नुकताच शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे येत कैलास मांढरे, किसन मांढरे, नितीन मांढरे यांनी पोलिसांचा सत्कार करून पोलिसांचे आभार मानले.