प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मोढळे यांचे घर कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील चांदीचे दागिने, वस्तू तसेच रोकड असा ५० हजाराचा ऐवज चोरून नेला.

    पिंपरी: शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून वाहन व मोबाईल चोरी पाठोपाठ घरफोडीचे गुन्हे समोर आले आहेत. यात चोरट्यांनी ३ लाख २८ हजाराचा ऐवज लंपास केला. घरफोडी प्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये पाच गुन्हे दाखल झाले.

    महादेव हरी आल्हाट (वय ४२, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आल्हाट यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून ७१ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम सोन्याचे दागिने व एक हजाराची रोकड चोरून नेली. बापूसाहेब अंकुश मोढळे (वय ४५, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोढळे यांचे घर कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील चांदीचे दागिने, वस्तू तसेच रोकड असा ५० हजाराचा ऐवज चोरून नेला.

    रघुनाथ रामदास बोडके (वय ५१, रा. माण, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी बोडके यांचे घर कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. घरातून ४० हजाराची रोकड आणि ५७ हजाराचे सोन्याचे दागिने असा ९७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. मगन धनाजी रायका (वय ६०, रा. चिखली) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रायका यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील गॅस, शेगड्या, सिलींडर, स्टीलची भांडी, प्लेट, वाट्या, लहान-मोठी पातेली, असे ९४ हजार रुपये किमतीचे घरगुती साहित्य चोरट्याने लंपास केले.

    हॉटेलचे शटर उचकटून चोरी

    पुनावळे येथे हॉटेलचे शटर उचकटून चोरीचा प्रकार घडला आहे. जितेंद्र निल्लपा साखरे (वय २५, रा. ताथवडे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साखरे यांचे पुनावळे येथील कोयते वस्ती येथे हॉटेल इन्फिनिटी वॅâपेâ या नावाने हॉटेल आहे. साखरे यांनी रविवारी (दि. २२) रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे हॉटेल बंद केले. चोरट्यांनी हॉटेलचे लोखंडी शटर उचकटून हॉटेलातील गल्ल्यामधील ११ हजार ८०० रूपयांची रोकड आणि पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा १६ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.