पाच टक्क्यात ठेकेदारांच्या नियमबाह्य बांधकामाला हिरवा कंदील?

बांधकामांच्या दर्जा संदर्भात प्रश्नचिन्ह

दौंड : दौंड पंचायत समितीमधील बांधकाम विभागाचे अभियंता विविध विकास बांधकामांचे मुल्याकंन करण्यासाठी एकूण कामांच्या रक्कमेतील पाच टक्के रक्कमेची मागणी संबंधित ठेकेदारांकडे करत असल्याची माहिती नाव उघड न करण्याचा अटीवर एका ठेकेदाराने सांगितले आहे. दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतच्या माध्यमातून वार्षिक कोट्यवधीची अनेक विकास कामे मंजूर करून गावाचा विकास केला जात आहे. यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागामार्फत जिल्हा परिषद निधी उपलब्ध करून दिली जातो. संबंधित ग्रामपंचायतच्या विकास कामांच्या प्रस्तावा प्रमाणे गावामध्ये कामे मंजूर केली जातात. यावेळी मंजूर विकास कामांचे अंदाजपत्रक करण्यासाठी दर्जा व नियंत्रणासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये बांधकाम विभाग कार्यरत असतो. यावेळी मंजूर विकास कामांचे बांधकाम योग्य व चांगल्या प्रतीचे होण्याची जबाबदारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर असते. यावेळी सर्व विकास बांधकामांचे योग्य पद्धतीने मूल्यांकन करून ठेकेदारांना पैसे अदा केले जातात.
-नियमबाह्य बांधकामाला हिरवा कंदील?
याचाच फायदा घेत पंचायत समितीमधील बांधकाम विभागाचे अधिकारी एकूण कामांच्या पाच टक्के रक्कम ठेकेदारांकडून स्वीकारून नियमबाह्य बांधकामाला हिरवा कंदील देत असल्याची माहिती नाव न उघड करण्याच्या अटीवर एका ठेकेदारानी सांगितले आहे. यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक पितळ उघडे पडले आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित बांधकामा संदर्भात प्रश्न उपस्थित केले असता ठेकेदारांना पाठीशी घालत शासकीय अभियंता खुलेआम ठेकेदारांचे वकीलपत्र घेतल्या सारखे ग्रामस्थांना बोलत आहेत. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
-गाळे बांधकामाची चौकशी करावी
कुसेगाव येथील अंगणवाडी व गाळे बांधकामाच्या एकूण रक्कमेतील तीन टक्के रक्कम शाखा अभियंता राजेंद्र पाटील व दोन टक्के रक्कम उप-अभियंता जाधव रोख स्वरूपात घेत असल्याने संबंधित ठेकेदारांना पाठिशी घालत असल्याची चर्चा अशी दबक्या आवाजात चर्चा परिसरात चालू आहे. तसेच स्थानिक स्वयंघोषित पुढाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदार बांधकामात अनियमिता करत असल्याचे आरोप स्थानिक नागरिक करत आहेत, स्थानिकांनी संबंधित बांधकामा संदर्भात प्रश्न उपस्थित केले असता तक्रारदारांवर राजकीय किंवा गावगुंडाचा दबाव आणून तक्रार माघारी घेण्याचा तगादा लावला जातो. यासंबंधी बांधकाम विभागाचे शाखा व उप अभियंता यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.  या प्रकरणाची जिल्हा परिषदच्या वरिष्ठांनी गंभीर दखल घेऊन कुसेगाव येथील अंगणवाडी व गाळे बांधकामाची निपक्ष चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.