भाजपला गळती सुरु; ‘या’ दिग्गज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

आमदार लक्ष्मण जगताप हे माझे गुरू आहेत, त्यांनीच मला राजकारणात आणले. त्यामुळे त्यांना सोडून चाललो वगैरे असे काही नाही, मी त्यांचाच आहे.

    पिंपरी : भाजपच्या पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक २९ च्या नगरसेविका, महापालिका महिला व बाल कल्याण समिती सभापती चंदा लोखंडे यांचे पती आणि माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादी  काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी शुक्रवारी (दि.२०) हातावर घड्याळ बांधले. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.

    पुण्यात झालेल्या पक्षप्रवेशावेळी राज्य वारकरी संघटनेचे विजयअण्णा जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप उपस्थित होते. महापालिकेची आगामी निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरे सुरु झाली आहेत. राजू लोखंडे हे २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. त्यापूर्वी शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणूनही त्यांनी केले. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी चंदा लोखंडे या पिंपळे गुरव, वैदूवस्ती प्रभागामधून भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. सध्या त्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती आहेत. राजू लोखंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना धक्का बसला आहे.

    लोखंडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, होय मी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वैदू समाज आजही शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या खूप मागासलेला आहे. राज्यात १४८ गावांतून आणि विशेषतः मराठवाड्यातून समाजाचे लोक आजही जगण्यासाठी धडपडत असतात, भटकंती करतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही अखिल महाराष्ट्र वैदू समाज संघटना स्थापन केली आहे. आता समाजाचा एक मेळावा घेणार आहोत.

    आमदार लक्ष्मण जगताप माझे गुरु

    अजित पवार यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले म्हणून मी केवळ सामाजिक भावनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आमदार लक्ष्मण जगताप हे माझे गुरू आहेत, त्यांनीच मला राजकारणात आणले. त्यामुळे त्यांना सोडून चाललो वगैरे असे काही नाही, मी त्यांचाच आहे, असेही राजू लोखंडे यांनी स्पष्ट केले.