माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी मोहिते पाटलांचे आरोप फेटाळले ;  पत्रकार परिषदेत अनेक विषयांचा खुलासा

शिरूर लोकसभा मतदारसंघातील ईतर पाचही तालुक्यात महाविकास आघाडीतील पक्षनेते सुसंवादाने काम करीत आहेत. मात्र आमदार मोहिते हे विध्वंसक वृत्तीचे असल्याने खेड तालुक्यात आघाडीची बिघाडी झाली असा घणाघाती आरोप आढळराव यांनी केला. पंचायत समिती इमारत बांधकाम जागा बदलण्यासाठी सभापती पोखरकर त्यांना भीक घालत नव्हते म्हणून पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे.

    राजगुरूनगर : खेड पंचायत समिती सभापतीपदाच्या वादासंदर्भात माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी शुक्रवारी (दि. २८) येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका विशद केली. अविश्वास ठरावावरून सभापतींनी केलेला गोळीबार, प्राणघातक हल्ला, विनयभंग हे आमदार दिलीप मोहिते यांनी केलेले आरोप कपोलकल्पित असल्याचा प्रत्यारोप आढळराव यांनी केला.याप्रसंगी पंचायत समितीतील काँग्रेसचे सदस्य अमोल पवार तसेच शिवसेनेचे रामदास धनवटे, बाबाजी काळे, तनुजा घनवट, सुरेश चव्हाण, विजया शिंदे, राहुल गोरे, राजेश जवळेकर, नितीन गोरे आदी उपस्थित होते.

    मोहिते यांचे डोणजे परिसरातील हॉटेल कोरोना काळातही चालू असल्याने त्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आढळराव यांनी केली.शिवसेनेच्या काही सदस्यांना या आमदारांनी त्यांच्या रिसॉर्टमध्ये बळजबरीने ठेवले असल्याचे कळल्याने सभापती भगवान पोखरकर त्यांना सोडवण्यास गेले होते. तिथे फक्त झटापटी झाली हे मी मान्य करतो. मात्र त्याचे कुंभांड रचण्यात आले. पोलिस फिर्यादीत अनेक खोटी कलमे लावण्यात आली आहेत. एकमेकांचे सदस्य फोडायचे नाही असे आघाडीचे ठरले असताना शिवसेनेचे सदस्य आमदारांनी रिसॉर्टवर नेले कसे याबाबत शिवसेनेचे अनिल देसाई व संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे, अशी माहिती आढळराव यांनी दिली.

    या प्रकरणाचा सुत्रधार मी असून माझ्यावर गुन्हा दाखल करा हा आरोप बिनबुडाचा आहे. उलट त्यांच्यावरच खंडणी, खून, विनयभंग आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोहिते यांनीच रिसॉर्टमध्ये सराईत ३०-३५ गुंड आणून ठेवले होते. माझी राजकीय कारकीर्द निष्कलंक आहे. विक्षिप्त स्वभावाच्या मोहिते यांच्यामुळे खेड तालुक्यात काहीच ‘ऑल वेल’ नाही, असे प्रतिपादन आढळराव यांनी केले.

    शिरूर लोकसभा मतदारसंघातील ईतर पाचही तालुक्यात महाविकास आघाडीतील पक्षनेते सुसंवादाने काम करीत आहेत. मात्र आमदार मोहिते हे विध्वंसक वृत्तीचे असल्याने खेड तालुक्यात आघाडीची बिघाडी झाली असा घणाघाती आरोप आढळराव यांनी केला. पंचायत समिती इमारत बांधकाम जागा बदलण्यासाठी सभापती पोखरकर त्यांना भीक घालत नव्हते म्हणून पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे. अविश्वास ठरावाच्या दिवशी पक्षाचा व्हीप काढणार आहे त्यामुळे सदस्यांवर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही. त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतल्याने त्यांचा व माझा संपर्क होत नाहिये अन्यथा ही वेळ आलीच नसती. सर्व सदस्य सदसद्विवेकबुद्धीने मतदान करतील असा विश्वास आढळराव यांनी यावेळी व्यक्त केला.