दोन वृद्ध महिलांसह तिघांकडून गांजा विक्री साडेचार किलो गांजा जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे विक्री करण्यासाठी गांजा बाळगत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा लावून कारवाई केली.

    पिंपरी: विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या तिघांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोन वृद्ध महिलांसह तिघांचा समावेश आहे. तिघांकडून पोलिसांनी १ लाख ३० हजार रुपये किमतीचा ४ किलो ६०३ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने भोसरी येथे शनिवारी ही कारवाई केली.

    माणकाबाई शहाजी वाघमारे (वय ६५, रा. आंबेडकरनगर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी), मामू उर्फ खान रमजान खान (वय ८३, रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी), सावित्रीबाई युवराज गायकवाड (वय ७०, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे विक्री करण्यासाठी गांजा बाळगत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा लावून कारवाई केली.

    भोसरीतील लांडेवाडी येथील आंबेडकरनगर झोपडपट्टी आणि विठ्ठलनगर झोपडपट्टी तसेच बालाजीनगर झोपडपट्टी येथे सापळा रचून छापा मारला. या कारवाईत १ लाख ३० हजार रुपये किमतीचा ४ किलो ६०३ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.