रविराज तावरे यांच्या वरील गोळीबार प्रकरणी चौघे ताब्यात ; एका अल्पवयीन मुलाचा समावेश

राजकीय वैमनस्यातून खूनाचा प्रयत्न झाल्याचे उघड

    बारामती: जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती व राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे यांच्यावर केलेल्या गोळीबार ‌ प्रकरणी एका अल्पवयीनासह चौघांना पोलिसांनी ताब्यात ‌घेतले आहे.

    मुख्य सूत्रधार प्रशांत मोरे याच्यासह राहुल उर्फ रिबेल यादव, विनोद उर्फ टॉम मोरे या तिघांना पोलिसांनी ‌अटक केली आहे,तर एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.यातील अल्पवयीन मुलाने रविराज तावरे यांच्या वर गोळी झाडली होती.तो इयत्ता १०वी मध्ये असताना त्याने पिस्तूल खरेदी केले होते, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

    सोमवारी (दि ३१) सायंकाळी सातच्या सुमारास रविराज तावरे हे पत्नी रोहिणी यांच्या सोबत आॅडी या गाडीतून माळेगाव (ता बारामती)परीसरातील संभाजीनगर याठिकाणी वडापाव आणण्यासाठी आले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रवीराज तावरे यांच्यावर गोळीबार केला,या घटनेत रविराज यांच्या छातीत एक गोळी लागली,तर दुसरी ‌गोळी गाडीच्या काचेवर ‌लागली. दरम्यान या घटनेत तावरे हे जखमी होऊन बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने बारामती येथील गिरीराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली होती. पोलीस अधीक्षक देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके तयार केली. अवघ्या तीन तासात तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यातील एक आरोपी उरीळी कांचन येथील आहे. मुख्य सूत्रधार प्रशांत मोरे याला मुंबई येथून अटक करण्यात आली. राजकीय वैमनस्यातून रविराज तावरे यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान बारामती तालुक्यातील सर्वात सधन ग्रामपंचायत असलेल्या माळेगावचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसानंतर माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर माळेगावात घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिस निरीक्षक महेश ढव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगोटे, फौजदार नितीन जाधव, राहुल जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, नितीन चव्हाण, दीपक दराडे, निखिल जाधव आदींनी सहभाग घेतला. दरम्यान रविराज तावरे यांच्यावर अवघड शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आले असून यश आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.