राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार प्रकरणी चार जणांवर मोक्कांतर्गत कारवाई

पोलिसांनी माळेगावच्या गोळीबार प्रकरणानंतर घेतलेल्या धडाकेबाज निर्णयामुळे माळेगाव परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे. रविराज तावरे यांच्यावर राजकीय आकसातून गोळीबार झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. येत्या काही दिवसात मालेगाव नगर पंचायतीची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोक्कांतर्गत केलेल्या कारवाईला अत्यंत महत्त्व आहे.

    बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलासह प्रशांत मोरे टोळीतील चौघांवर बारामती तालुका पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर ३१ मे रोजी गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे, रिबेल उर्फ राहुल यादव आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करत त्यांना पोलीसांनी अवघ्या सात तासात अटक केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाल्याने हायप्रोफाईल प्रकरण म्हणून पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहिले. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार केला. त्याला अवघ्या १४ दिवसात पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिल्याची माहिती बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते आणि पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. गुन्हा घडल्यापासून अवघ्या १५ दिवसांच्या आत संबंधित आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याची बहुदा पहिलीच वेळ आहे.

    पोलिसांनी माळेगावच्या गोळीबार प्रकरणानंतर घेतलेल्या धडाकेबाज निर्णयामुळे माळेगाव परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे. रविराज तावरे यांच्यावर राजकीय आकसातून गोळीबार झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. येत्या काही दिवसात मालेगाव नगर पंचायतीची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोक्कांतर्गत केलेल्या कारवाईला अत्यंत महत्त्व आहे.

    -पोलिसांची साफसफाई करणार- पोलीस उपाधीक्षक मिलिंद मोहिते यांची माहिती

    माळेगाव आणि परिसरातील पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांचे आणि अधिकाऱ्यांचे इथल्या स्थानिक गुन्हेगारांशी आणि राजकीय लोकांशी जास्त लगट असल्याचे दिसून येत आहे. त्यातून गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणार्‍या पोलिस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेक लोकांनी व्यक्त केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिस ठाण्यांमध्ये काम करणाऱ्या पोलिसांची आणि अधिकाऱ्यांची साफसफाई करण्याची गरज असल्याचे पोलिस उपाधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले. त्या पार्श्वभूमीवर लवकरच परिसरातल्या पोलीस ठाण्यातील अंतर्गत बदल्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.