भोर शहर खून प्रकरणातील ‘तो’ फरार आरोपी अखेर अटकेत

भोर शहरातील सम्राट चौकात शनिवार (दि.२) रात्री कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आलेल्या आनंद गणेश सागळे या तरुणाचा खून करणाऱ्या चार आरोपींपैकी तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली.

    भोर : भोर शहरातील सम्राट चौकात शनिवार (दि.२) रात्री कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आलेल्या आनंद गणेश सागळे या तरुणाचा खून करणाऱ्या चार आरोपींपैकी तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी ही कारवाई २४ तासांच्या आत पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ (ता.भोर) येथील पुलाखाली रविवार (दि.३) रात्री अकरा वाजता अटक केली. मात्र, त्यातील फरार आरोपी सिद्धांत संजय बोरकर याला भोर पोलिसांनी मोठ्या शिताफीने मंगळवार (दि.५) रोजी वडगाव (ता.भोर) हद्दीत पेट्रोल पंपाजवळ येथून जेरबंद केले.

    याबाबत माहिती अशी की, भोर शहरातील सम्राट चौकात शनिवार (दि.२) रात्री साडेअकराच्या सुमारास आनंद गणेश सागळे या तरुणाचा सनी सुरेश बारंगले (रा. सम्राट चौक, भोर) अमीर महंमद मनेर, समीर महंमद मनेर (दोघेही रा. नवी आळी भोर) व सिद्धांत संजय बोरकर (रा. स्टेट बँकेच्या शेजारी भोर) यांनी दारूच्या बाटल्या व धारदार शास्त्राने डोक्यात, अंगावर, चेहऱ्यावर वार करीत खून केला. त्यानंतर चौघेही फरारी झाले होते या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या व भोर पोलीस स्टेशनच्या खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीमुळे पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावातील पुलाखाली सापळा रचून सनी सुरेश बारंगले, अमीर महंमद मनेर, समीर महंमद मनेर हे बंगरुळला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच रविवार (दि.३) रात्री आकरा वाजता ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

    चौथा आरोपी सिद्धांत संजय बोरकर हा वडगाव हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ असल्याची खबर पोलीस नाईक अमोल मूरहे यांना मिळाली. भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शाखाली सहकारी पोलीस हवालदार अविनाश निगडे व पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार भिसे यांना सोबत घेऊन वडगाव (ता. भोर) हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ शिरवळ (ता. खंडाळा) दिशेने जाण्याच्या प्रयत्नात असताना मंगळवार (दि.५ रोजी) रात्री ताब्यात घेतले.