खाजगी सावकारी करणाऱ्या दोघांविरोधात चौथा गुन्हा दाखल

दौंड : बेकायदेशीर खाजगी सावकारी करत व्याजाने पैसे देवून त्या व्याजापोटी जबरदस्तीने जमिनी ग्रहण केल्याप्रकरणी बाळासाहेब उत्तम शितोळे व शहाजी उत्तम शितोळे यांच्यावर शुक्रवार (ता.१४) रोजी यवत पोलीस ठाण्यात सावकारी प्रकरणी चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शेतकरी संतोष शितोळे यांची कुसेगाव येथे वडिलोपार्जित शेती असून उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसाय करत आहेत . सन २००८ मध्ये शेतीच्या मशागतीसाठी व इतर कारणांसाठी पैशांची अवश्‍यकता असल्याने संतोष शितोळे यांनी मित्राच्या ओळखीने बाळासाहेब उत्तम शितोळे व शहाजी उत्तम शितोळे यांच्याकडून दोन लाख रुपये प्रति महिना अडीच टक्के व्याजदराने पैसे घेतले होते, यावेळी कुसेगाव येथील गट क्रमांक ८२ मधील ४६ आर जमीन एप्रिल २००८ मध्ये पोकळस्त दस्ताव्दारे खरेदीखत केले होते, पुढील सहा महिने व्याजचे प्रत्येकी तीस हजार रुपये सावकार यांना जमा केले होते,  दुष्काळी परिस्थितीमुळे व्याजाची रक्कम वसूल न झाल्याने सावकारांने जमिनीचे मूल्यकांन फक्त ६२ हजार रुपये खरेदीखतामध्ये नोंदवून सर्व जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली, यावेळी फिर्यादी संतोष शितोळे यांनी सावकारीच्या त्रासाला कंटाळून सहायक निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार केली होती,

या अनुषंगाने पुणे ग्रामीणची सहकारी संस्था कार्यालयातुन जानेवारी २०१८ रोजी चौकशीचे आदेश देण्यात आले होते, यावेळी बाळासाहेब उत्तम शितोळे व शहाजी उत्तम शितोळे (रा.कुसेगाव) हे शेतकऱ्या सोबत जमीन खरेदीचे व्यवहार सावकारी व्यवहारातून केल्याचे स्पष्ट झाले होते, यावेळी जिल्हा उपनिबंधक यांनी शेतकरी संतोष शितोळे यांनी तारण ठेवलेली जमीन परत देण्याचे आदेश मे २०१९ मध्ये दिले होते, 

तसेेेच दौंड विभागाचे सहा. निबंधक यांच्या तक्रारीवरून तिसरा गुन्हा व पोलीस विभागाकडून एक गुन्हा असे एकूण अवैध सावकारी प्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियन २०१४ प्रमाणे कलम ३९ नुसार चार गुन्हे बाळासाहेब उत्तम शितोळे व शहाजी उत्तम शितोळे यांच्यावर दाखल करण्यात आले होते,

“कुसेगाव येथे बेकायदेशीर सावकारी केल्या प्रकरणी तीन गुन्हे दाखल होऊनही पोलिसांनी संबंधित आरोपींना एकही दिवस अटक केली नाही, तसेच १४ ऑगस्टला चौथा गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झाले तरी यवत पोलिसांनी सावकारांना अटक केली नाही, यवत पोलिसांनी संबंधित आरोपींना आश्रय न देता त्वरित अटक करावी नाही तर यवत पोलीस ठाण्या समोर आंदोलन केले जाईल.”

–  संतोष शितोळे (शेतकरी, कुसेगाव)