electricity

लोणी काळभोर : दुकानासाठी वर्षभऱाहून अधिक काळ थेट खांबावरुन बेकायदा विजेचा वापर केल्या प्रकरणी शिंदवणे (उरुळी कांचन) येथील दोन भावांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने लोणी काळभोर पोलिसांत दीड लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

कुल्फीच्या दुकानासाठी चोरुन विज वर्षभराच्या काळात वापर करण्यात आली होती.  या प्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोपाल श्रीराम पाटील यांनी रमेश विठ्ठल महाडिक व अभिजित रमेश महाडीक ( दोघे रा. पाटील वस्ती, शिंदवणे, ता. हवेली) दोन भावांविरोधात महावितरण कंपनीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली  आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश महाडिक व अभिजित महाडीक यांच्या मालकीचे शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत कुल्फीचे दुकान आहे. मागिल मार्च महिण्याच्या पहिल्या आठवड्यात महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संजय जाधव व तंत्रज्ञ महेश दरेकर हे दोघेजण मिटर तपासणीसाठी महाडीक यांच्या दुकानात गेले असता, त्यांना दुकानाच्या भिंतीवर विज मिटर लटकावल्याचे आढळून आले. यावर संजय जाधव व महेश दरेकर या दोघांनी मिटरची बारकाईने पाहणी केली असता, मीटरला विज जोडणीसाठी विजेच्या खांबावरुन आलेली विजेची वायर मिटरला जोडली नसल्याचे, जाधव यांच्या लक्षात आले. यावर जाधव व दरेकर यांनी बारकाईने पाहणी केली असता. महाडीक बंधूंनी दुकानापासून चारशे मीटर अंतरावरील विजेच्या खांबावरुन थेट बेकायदा वायर जोडून, कुल्फी दुकानासाठी विज वापरत असल्याची निष्पण झाले आहे.  

दरम्यान विज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने तांत्रिक बाबींचा अभ्यास केला असता, महाडीक बंधूंनी वर्षभराच्या काळात ८६५४ युनिट विज चोरुन वापरल्याचे पुढे आले. यामुळे विज वितरण कंपनीचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. या वीज चोरी बद्दल महाडीक बंधूंच्या विरोधात भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ नुसार लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.