कोरोनाने मृत्यू झालेल्या पालकांच्या मुलांना मोफत शिक्षण : प्रकाश ओसवाल

    तळेगाव दाभाडे : जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकाचा कोरोनाने मृत्यू झाला असेल तर शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या त्या पाल्याला दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत देण्यात येईल, असा निर्णय जैन इंग्लिश स्कूलच्या शालेय समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश ओसवाल यांनी दिली.

    तळेगाव आणि परिसरामध्ये सद्यस्थितीला कोरोना संसर्गाचे प्रमाण जास्त असून, यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनाबाधित रुग्णांना बरे होण्यासाठी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून जैन इंग्लिश स्कूलमधील शालेय समितीने ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचा या कोरोना महामारीत मृत्यू झाला. त्या विद्यार्थ्याचे पूर्ण इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत करणार आहेत. तसेच २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षामध्ये जैन इंग्लिश स्कूलमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमधून २५ टक्के सूट दिल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश ओसवाल यांनी दिली.

    तळेगाव आणि परिसरामध्ये अनेक इंग्लिश माध्यमाच्या शाळा कार्यरत आहेत. त्या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकाचा कोरोनाने मृत्यू झाला असेल तर जैन इंग्लिश स्कूलने स्वीकारलेल्या धोरणाप्रमाणे सर्वांनी सामाजिक बांधिलकी म्हणून उपक्रम राबवावा, असे काही नागरिकांचे म्हणणे आहे.