फेसबुकवरील मैत्री पडली महागात! व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत केली भरमसाठ पैशांची  मागणी

सायबर विभागाने या प्रकरणाची माहिती दिली आहे. दोन तरुणांची फेसबुक या सोशल माध्यमावर ओळख झाली होती. या दोघांमध्ये चांगलीच मैत्रीही झाली. दोघांनी एकमेकांना नंबर देखील शेयर केले. या दोघांमध्ये व्हाट्सअपवरून सतत बोलणे होत होते. याच दरम्यान २९ वर्षीय तरुणाचा नग्न अवस्थेमधील व्हिडिओ आरोपीने रेकॉर्ड केला.

    पुणे :  पुण्यातील एका तरुणांची फेसबुकवरून एका तरुणासोबत ओळख झाली. याच ओळखीचा फायदा उठवत त्या तरुणाने पुण्यातील तरुणाचा नग्न अवस्थेमधील व्हिडिओ तयार केला. तो व्हायरल करण्याची धमकी देत १० हजार रूपयांची मागणी केली. त्यावर आपल्याकडे फक्त ९५७ रुपयेच असल्याचे पीडित तरुणाने सांगितलं. ते ९५७ रुपयेही ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाने घेऊन टाकले. या प्रकरणी आता सायबर विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सायबर विभागाने या प्रकरणाची माहिती दिली आहे. दोन तरुणांची फेसबुक या सोशल माध्यमावर ओळख झाली होती. या दोघांमध्ये चांगलीच मैत्रीही झाली. दोघांनी एकमेकांना नंबर देखील शेयर केले. या दोघांमध्ये व्हाट्सअपवरून सतत बोलणे होत होते. याच दरम्यान २९ वर्षीय तरुणाचा नग्न अवस्थेमधील व्हिडिओ आरोपीने रेकॉर्ड केला.

    त्यानंतर ‘मला १० हजार रुपये दे, अन्यथा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल करेल,’ अशी धमकी त्याने दिली. त्यावर पीडित तरुण म्हणाला की, ‘माझ्याकडे पैसे नाही. इतके पैसे मी देऊ शकत नाही.’ ब्लॅकमेल करणारा तरुण त्याचा पिच्छा सोडत नव्हता. सततच्या होणार्‍या पैशांच्या मागणीला वैतागून त्याने, ‘माझ्याकडे ९५७ रुपये आहे.’ इतकेच पैसे असल्याचं सांगत त्याने ते गुगल पे वरुन देऊन टाकले.पण, प्रकरण थांबलं नाही. त्यानंतर देखील ब्लॅकमेल करणारा तरुण सतत पैशांची मागणी करायचा. धमकी देणंही सुरूच होतं. त्यामुळे पीडित तरुणाने सायबर विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. त्या फिर्यादी तरुणांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास करण्यात येत असल्याची माहिती सायबर विभागाचे वरिष्ठ निरीक्षक एस. माळी यांनी दिली.