संतांच्या अभंगातून रिक्षाचालकांचे सत्ताधार्‍यांना साकडे

भांडाराची कवाडे खुली करणार्‍या संत दामजीपंतांची डॉ.बाबा आढाव यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण

पुणे :काहीं करीना उपाय । दिवसें दिवस व्यर्थ जाय I – संत नरहरी सोनार, चहूंकडे देवा दाटला वणवा । कां न ये कनवा तुजलागीं I – संत निर्मळा, तुझा माझा देवा कां रे वैराकार।दुःखाचे डोंगर दाखविशी ॥-संत नामदेव, नको देवराया अंत आता पाहू- संत कान्होपात्रा, जरी तुम्हां उबग आलासे दीनांचा।अभिमान कोणाचा कोणाकडे॥ -संत कर्ममेळा, आम्ही बैसलोसे दारी दे दे म्हणोनी मागतो हरि-संत सोयराबाई असे दिन,दलित,शोषित,दुख्खी माणसाच्या वेदना मांडणारे कष्टकरी मराठी संतांच्या अभंगांनी आज डेक्कन जिमखान्यावरील शिवसेना भवनाचा परिसर दुमदुमला. रिक्शाचालक कल्याणकारी मंडळ, मुक्त रिक्शा परवाना बंदी,वाहन कर्ज कोरोना काळ कर्जमुक्ती,टाळेबंदी काळातील विमा हफ्ते परत मिळावे इ. मागण्यांसाठी राज्य शासन चालवणार्‍या सत्ताधारी पक्षांकडेच न्यायासाठी दाद मागण्याचा निर्णय रिक्शा पंचायतीने घेतला आहे. याची सुरुवात प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या डेक्कन जिमखान्यावरील कार्यालयासमोर अभंग दिंडी निदर्शने या अनोख्या आंदोलनाने झाली. सत्ताधारी शिवसेना ही मराठी माणसाचे हित जपणारी, मराठी भाषा संस्कृतीचा आग्रह धरणारी संघटना/पक्ष असे स्वतःला म्हणवते. मराठी संस्कृतीचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे,वारकरी परंपरा आहे. त्याच मराठी वारकरी संतांच्या भाषेत त्यांनी आपले प्रश्न मांडले.

गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र विक्रमी पावूस कोसळत असतानाही जगण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रिक्शा चालक आज सकाळी 10.30 वा. गरवारे भुयारी मार्ग येथील छ.संभाजी पुतळा येथे मोठ्या संख्येने जमले. छ. संभाजी पुतळ्याला हार अर्पण करून रिक्शाचालकांची पायी दिंडी शिवसेना भवन समोर पोहचली. दिंडीत नामदेव-तुकाराम-ज्ञानेश्वर/फुले-शाहू-आंबेडकर,ख्रिस्त-महंमद-महावीर/बुद्ध-नानक- बसवेश्वर, अण्णाभाऊ – मौलाना- सावित्रीबाई / गोरोबा-चोखोबा-जनाबाई अशी धर्म पंथ संस्थापक, समाजसुधारक यांच्या नावांची गुंफण केलेला नामघोष केला जात होता. संतांनी अभंगातून जे प्रश्न उपस्थित केले होते,जी मागणी केली होती त्या अभंग वचनांचे फलक रिक्शा चालक वारकर्‍यांनी गळ्यात घातले होते. तसेच रिक्शा चालकांच्या मागण्यांचे फलक, वारकरी पंथाची पताका,रिक्शा संघटनेचे काळा पिवळा रंगाचे झेंडे यांनी दिंडी लक्ष वेधत होती. शिवसेना भवना समोर दिंडी येताच महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्याच्या प्रार्थनेने निदर्शनांना सुरुवात झाली. आधी आर्जव,विनंती करणारे वरील अभंग म्हणण्यात आले. नंतर संत जनाबाईंच्या रोख ठोक भाषेत अरे विठया विठया । मूळ मायेच्या कारटया I उभी राहुनी अंगणी शिव्या देते दासी जनी असा इशाराही रिक्शा चालक वारकर्‍यांनी दिला. तसेच शासनाला आवश्यक वृत्तीची, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा अभंगही सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधींना ऐकवण्यात आला. ‘दया करणे जे पूत्रासी तेची दासा आणि दासी ’ ही समन्यायी भूमिकेची राज्यकर्त्यांकडून अपेक्षाही व्यक्त केली गेली गेली. शेवटी मागण्यांचे निवेदन देवून महाराष्ट्र सुखी करण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची भावना व्यक्त करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व आंदोलक यांनी सामूहिकरीत्या संत ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हंटले.

त्याआधी जेष्ठ समाजसेवक व रिक्शा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनीही निदर्शनात हजेरी लावली त्यांनी मंगळवेढ्याच्या संत दामाजी पंतांची आठवण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोंना महासंकटात ठेवावी असा वडिलकीचा सल्ला दिला. “ बिदरच्या बादशहाच्या रागालोभाची, होणार्‍या परिणामांची पर्वा न करता सरकारी अधिकारी दामाजी पंतांनी सरकारी धान्य कोठारे भुकेल्या जनतेला खुली केली. रिक्षाचालकांसह कष्टकरी जनता कोरोंना काळात जगवायची असेल तर मुख्यमंत्र्यांना हीच भूमिका घ्यावी लागेल. ” असे ते म्हणाले,

शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी निवेदन स्विकारले. परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांनाही कोरोंनाची बाधा झाली आहे. त्यातून बाहेर पडताच रिक्शा प्रश्नी ते पुण्यात येवून बैठक घेतील असे परब यांनी सांगितल्याचे दोघांनी स्पष्ट केले