अंत्यविधीसाठी लागणारे मयत पासेस लवकरच ‘ऑनलाईन ’ उपलब्ध होणार

पुणे ः अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच्या पाससाठी करावी लागणारी धावपळ आता थांबणार आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी ऑनलाईन पासेस उपलब्ध करून दिले आहे. यामुळे शहरातील कुठल्याही रुग्णालयामध्ये एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याच हॉस्पीटलमधून महापालिकेच्या पीएमसी केअर या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. या सुविधेची चाचणी पूर्ण झाली असून लवकरच याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेेचे उपायुक्त श्रीनिवास कंदुल यांनी दिली.

 पासेससाठी नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबणार

 पुणे ः अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच्या पाससाठी करावी लागणारी धावपळ आता थांबणार आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी ऑनलाईन पासेस उपलब्ध करून दिले आहे. यामुळे शहरातील कुठल्याही रुग्णालयामध्ये एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याच हॉस्पीटलमधून महापालिकेच्या पीएमसी केअर या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. या सुविधेची चाचणी पूर्ण झाली असून लवकरच याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेेचे उपायुक्त श्रीनिवास कंदुल यांनी दिली.
        पुण्याची लोकसंख्या सुमारे ४० लाख इतकी आहे. दर महिन्याला पुणे शहरात सुमारे सव्वादोन हजार नागरिक मरण पावतात. विविध धार्मिक रिवांजांनुसार शहारामध्ये जवळपास प्रत्येक भागात स्मशान आणि दङ्गनभूमी आहेत. या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेच्या मयत पासेस महत्वाचे असतात. महापालिकेच्यावतीने मागील काही वर्षात महापालिकेची रुग्णालये, क्षेत्रिय कार्यालये, ससून आणि विश्रामबाग वाडा येथे पासेस देण्याची व्यवस्था केली आहे. परंतू महापालिकेची काही रुग्णालये आणि क्षेत्रिय कार्यालये संध्याकाळी बंद झाल्यानंतर बरेचदा तेथे कर्मचारी नसल्याने नागरिकांना अगदी उपनगरातून विश्रामबाग वाडा अथवा ससून रुग्णालयात जावे लागते. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये देखिल पासेस देण्याची व्यवस्था आहे. परंतू तेथेही रात्री दहा वाजल्यानंतर कर्मचार्‍या अभावी पासेस मिळत नाही. यामुळे रात्रीच्यावेळी अंत्यसंस्कार करण्यात अडचणी आणि विलंब लागतो.
        या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने मयत पासेस ऑनलाईन मिळतील, अशी व्यवस्था केली आहे. शहरातील कुठल्याही हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाल्यास तेथूनच ऑनलाईन पाससाठी अर्ज करता येणार आहे. महापालिकेच्या पीएमसी केअर या वेबसाईटवर हा फाॅर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वैकुंठ, कैलास आणि येरवडा स्मशानभूमीमध्ये संगणक बसविण्यात आले आहेत. याठिकाणी असलेल्या कर्मचार्‍यांना हॉस्पीटलमध्ये भरलेला फाॅर्म, त्यावरील क्रमांक व अन्य डिटेल्स पाहता येणार आहेत. तसेच अन्य ठिकाणच्या स्मशानभूमी आणि दफनभुमीमध्येही कर्मचार्‍यांना ऑनलाईन पास पाहता येतील, अशी सुविधा करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाचे उपायुक्त श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले.
        कंदुल म्हणाले, की ऑनलाईन मयत पास नोंदणीची यशस्वी चाचणी झाली असून लवकरच ही प्रक्रिया जाहीर करण्यात येईल. बरेचदा ज्येष्ठ नागरिक आणि काही व्याधींनी त्रस्त असणार्‍यांचा घरीच मृत्यू होतो. सद्यस्थितीत नगरसेवकांच्या पत्रावरुन अशा व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारांसाठी पासेस दिले जातात. परंतू घरीच मृत झालेल्या व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन पासेस देण्यासाठी नगरसेवकांचे पत्र अथवा डॉक्टरांनी दिलेले मृत्यूचे सर्टीफिकेट पाससाठी ऑनलाईन फाॅर्म भरताना स्कॅन करून जोडण्याबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
        ऑनलाईन मयत पासेसमुळे नागरिकांची विनाकारण ससेहोलपट थांबण्यास मदत होणार आहे. यासोबतच महापालिकेकडील मृत्यूंच्या नोंदणीचे कामही सुलभ होणार असून मृत्यूचे दाखले देण्यास लागणारा २१ दिवसांचा कालावधीही कमी होणार आहे. येत्या काही दिवसांत ऑनलाईन मयत पासेस देण्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही कंदुल यांनी नमूद केले.
 
जन्म – मृत्यूचे दाखला वेळेत मिळणार !
 शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर जवळपास १५ मार्चपासून शहरातील जन्म – मृत्यू नोंदणी कार्यालयात काम ठप्प झाले आहे. यामुळे मागील सुमारे दोन महिन्यांत शहरात किती जन्म आणि मृत्यू झाले याची एकत्रित आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध होत नाही. सध्याच्या कार्यपद्धतीनुसार रुग्णालये अथवा स्मशानभूमी, दफनभूमींकडून दिल्या जाणार्‍या मयत पासेसची माहिती आल्यानंतर त्याची कसबा जन्म- मृत्यू कार्यालयात नोंद होते. ही पद्धत वेळखाउ असल्याने जन्म – मृत्यूचा दाखलाही २१ दिवसांनंतर मिळतो. या विलंबाचा फटका मृतांच्या नातेवाईकांना बसतो. या पार्श्‍वभुमीवर ऑनलाईन नोंदणीमुळे हा विलंब कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.