गणेश भक्तांनी गणेश मूर्तीचे विसर्जन राहत्या घरामध्ये करावे

पिंपरी-चिंचवडचे उपायुक्त  विनायक ढाकणे यांचे आवाहन
तळेगाव दाभाडे: तळेगाव आणि परिसरामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये गणेश भक्तांनी गणेश मूर्तीचे विसर्जन राहत्या घरामध्ये विसर्जन कुंड निर्माण करून त्याठिकाणी करावे. किंवा ज्या ठिकाणी मूर्ती संकलन होत आहे त्या केंद्रावर मूर्ती संकलन करावे, असे आवाहन गणेशोत्सव शांतता कमिटीच्या सभेत पिंपरी-चिंचवडचे उपायुक्त विनायक ढाकणे यांनी केले.
येथील सुशीला मंगल कार्यालयांमध्ये तळेगाव दाभाडे नगरपरिषद व तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या गणेशोत्सव शांतता कमिटीच्या बैठकीत ढाकणे बोलत होते. यावेळी तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वाहतूक विभाग प्रमुख सतीश पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, नागरगोजे, दिगंबर अतिग्रे, उद्योजक किशोर आवारे तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे नगरसेवक सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
-शासनाच्या नियमावलीचे पालन करावे
यावेळी गणेश मंडळांनी वाढता कोरणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमावलीचे पालन करावे. गणेश भक्तांसाठी सामाजिक उपक्रम राबवावेत. आगमन आणि विसर्जन या मिरवणुका टाळाव्यात. तसेच गणेश विसर्जन स्वतःच्या घरात व्यवस्था करून करावे. किंवा सामाजिक संस्थांनी उभारलेल्या संकलन केंद्रावर जमा करावेत,असे आवाहन ढाकणे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी केलेल्या मनोगता मधून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमावलीचे पालन करावे. या कालावधीमध्ये समाजोपयोगी कार्य करावे.
-श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करताना काळजी घ्यावी
श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करताना काळजी घ्यावी. मर्यादित संख्या मध्येच  पूजा आरती आदी उपक्रम  करावेत.आदी सूचना यावेळी करण्यात आल्या. स्वागत तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी केले. प्रास्ताविक दीपक झिंजाड यांनी केले. आभार एमआयडीसी पोलीस निरीक्षक ओव्हाळ यांनी केली.