”गणेशाच्या मूर्तीला मास्क लावू नये’

प्रमुख गणेश मंडळांचे आवाहन पुणे : गणेश मूर्तीकारांनी आपल्या “क्रिएटीव्हिटी’ला यंदा लगाम घालावा लागणार आहे. करोनाबाबत जनजागृती करताना गणेश मूर्तींचे पावित्र्य राखले जाईल, याचे भान त्यांनी

प्रमुख गणेश मंडळांचे आवाहन

पुणे :
गणेश मूर्तीकारांनी आपल्या “क्रिएटीव्हिटी’ला यंदा लगाम घालावा लागणार आहे. करोनाबाबत जनजागृती करताना गणेश मूर्तींचे पावित्र्य राखले जाईल, याचे भान त्यांनी ठेवावे, असे आवाहन गणेश मंडळांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मूर्तीकार आपली कलाकुसर वापरून मातीचा वेगवेगळा आकार देतात. दरवर्षी विविध “ट्रेन्ड’नुसार लाडक्‍या बाप्पाला आकार देण्यात येतो. याशिवाय विविध ठिकाणी जनजागृती करणाऱ्या देखाव्यांची निर्मिती करण्यात येते. अनेक ठिकाणी यातून सामाजिक संदेश देण्यात येतो. अगदी “बाहुबली’, “गब्बर’ गणपती, हातामध्ये आधुनिक उपकरणे घेतलेला गणपती, “बालगणेश’, विविध वाहनांवर आरूढ झालेला गणपती अशा एक ना अनेक प्रकारच्या “ट्रेन्डी’ मूर्ती दरवर्षी बाजारात सर्रास पाहायला मिळतात.

मध्यंतरी करोना व्हायरसचा संहार करणाऱ्या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यामध्ये “चायना’ असे लिहून करोनाची व्हायरसची प्रतिकृती तयार केली होती. तर याचा संहार करणाऱ्या गणरायाच्या हातामध्ये “त्रिशुल’ दाखवले होते. या सगळ्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या करोनाचे निमित्त साधून, मास्क असणाऱ्या मूर्ती घडवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा मूर्तीचे पावित्र्य भंग होईल, अशा प्रकारे कोणी गणरायाला मास्क लावू नये. मूर्तीचे पावित्र्य जपावे, असे आवाहन गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश मंडळे, कार्यकर्ते, मूर्तीकार आणि भाविकांना केले आहे.

 

"गणपतीच्या मूर्तीचे पावित्र्य राखणे आवश्‍यक आहे. कार्यकर्त्यांनी आणि प्रामुख्याने मूर्तिकारांनी याचा अनादर करू नये. सर्वांनी बाप्पाचे मांगल्य आणि पावित्र्य सांभाळावे."

– अशोक गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट