गणेश मंडळांनी मंडपाच्या हौदात गणेश विसर्जन करावे

तळेगाव दाभाडे : तळेगाव शहरातील सर्व घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणच्या गणेश मूर्तीचे विसर्जन सार्वजनिक ठिकाणी न करता घरात निर्माण केलेल्या हौदात तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मंडपाच्या हौदात विसर्जन करावे. कोणीही मिरवणुका काढू नयेत.असे परिपत्रक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी प्रसिद्धीस दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ तसेच घरगुती गणेश भक्तांनी हा उत्सव अत्यंत साधेपणाने करायचं ठरवलं आहे. यामुळे कोणीही गर्दी न करता सोशल डिस्टन पाळून हा उत्सव साजरा करायचा आहे. त्यास अनुसरून सार्वजनिक गणेश मंडळ तसेच नागरिकांनी श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा अत्यंत साधेपणाने परंतु उत्साहाने साजरी केली आहे. श्रीगणेशाच्या प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर साधारणपणे दीड, तीन, पाच, सात तसेच दहाव्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जन केले जाते. यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून तळेगाव गाव भागासाठी पै. विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुल येथे तर तळेगाव स्टेशन येथे फ्रेंड्स ऑफ नेचरचे यशवंत नगर मधील कार्यालय येथे मूर्ती संकलनाची व्यवस्था केली आहे. ज्या गणेश भक्तांना घरी विसर्जन कुंड तयार करून गणेश विसर्जन करता येत नसेल त्यांनी वरील संकलन केंद्रच्या ठिकाणी मूर्तीदान करावे,असे आवाहन मुख्याधिकारी झिंजाड यांनी केले आहे.

-..तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल
तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या नागरिकांनी श्री गणेश मूर्तीची स्थापना केलेली आहे त्यांनी गणेश मूर्तीचे विसर्जन आपापल्या घरीच करायचे आहे. कोणीही नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन तळ्यावर किंवा नदीवर करायचे आहे. जे नागरिक गणेश मूर्तीचे विसर्जन नदीवर किंवा तळ्यावर करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. श्री गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखणे कामी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे कामी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी पत्रकाव्दारे प्रसिध्द केले.